परमेश्वराने सृष्टीच्या सुरुवातीला आणि मानवाच्या आगमनाच्या वेळी, आपली सर्जनशील वैश्विक ऊर्जा ही केवळ प्रतिकर्षणानेच नव्हे, तर अशा ज्ञानी शक्तीनेदेखील भारली की, ज्याद्वारे जगात इतस्तत: भटकणारे आत्मे परत येऊन ब्रह्माशी म्हणजेच परमेश्वराशी एकरूप होऊ शकतील. “योगाचे अवतार” म्हणून ओळखले जाणारे महान संत परमहंस योगानंद यांनी भगवद्गीतेवरील ‘ईश्वर-अर्जुन संवाद’ या त्यांच्या भाष्यात हे सुंदर शब्द लिहिले आहेत. ते म्हणतात की योगाचे विज्ञान कधीही नष्ट होऊ शकत नाही, कारण ते मनुष्यातील अंतर्यामीच्या परमसत्याशी जोडलेले आहे.
जेव्हा अवनत होणारा आत्मा मनाच्या प्रभावाखाली येतो, तेव्हा तो सामान्यतः मानवी जाणिवेशी एकरूप होऊन मर्यादित होतो. पंचेंद्रियांनी प्रभावित झालेले हे मन केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही आव्हाने आणि समस्या निर्माण करून जगातील अशांततेचे कारण बनते. मग, शांती आणि आनंदाच्या लालसेने, तो पुन्हा त्याच्या आत असलेल्या एकत्त्वाच्या शक्तीने ब्रह्मत्वाकडे जातो – हा योग आहे. महान ऋषी पतंजलीच्या मते, योग म्हणजे “योगश्चित्तवृत्तिनिरोधः– अर्थात चित्त किंवा अंत:करणाच्या प्रवृत्तींना थांबवणे आहे.
मनाच्या अति वेगवान गतीला थांबवणे सोपे नाही, पण अशक्यही नाही. पण यासाठी आपल्याला योगाच्या काही खास तंत्रांची आवश्यकता आहे. योग विज्ञान, जो भारताचा वारसा आहे, खरोखरच ती संपूर्ण जगाला एक देणगी आहे; त्याचे महत्त्व ओळखून, संयुक्त राष्ट्र महासभा आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी 2015 मध्ये 21 जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणून घोषित करून संपूर्ण मानवजातीचे कल्याण केले आहे.
पाश्चिमात्य देशांमध्ये ‘योगाचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे परमहंस योगानंद यांनी त्यांच्या आयुष्यातील 30हून अधिक महत्त्वाची वर्षे पाश्चिमात्य देशांमध्ये घालवली. भारतात “योगोदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया” आणि अमेरिकेत “सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिपची” स्थापना करून, त्यांनी ‘क्रियायोग ध्यान’ जी योगाची एक प्रगत आणि विशेष शैली आहे, या विज्ञानाच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी एक माध्यम तयार करून दिले, जे याकरिता इच्छुक असणाऱ्या लोकांना दु:ख आणि काळजीच्या दलदलीतून पार होण्याचे आश्वासन देते.
योगानंदजींनी त्यांच्या ‘योगीकथामृत’ या पुस्तकात, जे मन आणि आत्म्याची कवाडे उघडणारे पुस्तक मानले जाते, 26 व्या प्रकरणात, क्रियायोगाचा अर्थ असा स्पष्ट केला आहे – “‘विशिष्ट कृती किंवा पद्धतीने (क्रिया) अनंत परमतत्त्वाशी एकरूप होणे (योग).’ जो योगी या पद्धतीचे निष्ठापूर्वक आचरण करतो, तो हळूहळू कर्माच्या बंधनातून किंवा कार्यकारण-प्रभाव संतुलनाच्या नियमबद्ध साखळीतून मुक्त होतो.”
हे महान योगतंत्र केवळ जगाचा त्याग केलेल्या संन्याशानांच उपलब्ध नाही, तर मृत्युंजय बाबाजी आणि त्यांचे शिष्य लाहिरी महाशय यांच्या कृपेने, सर्व योगसाधनेच्या इच्छुकांनादेखील उपलब्ध आहे. हा महान क्रांतिकारी योग जाणून घेण्यासाठी, वाचक “योगदा सत्संग सोसायटीची” वेबसाइट yssi.org ला भेट देऊ शकतात. ही वेबसाइट घरबसल्या पाठ मिळविण्यासाठी आणि योगाचे हे वैज्ञानिक तंत्र सहजपणे शिकण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे.
पाठमालेसाठी नावनोंदणी करून आणि काही काळ मूलभूत तंत्रांचा सराव करून, 50 वॅटच्या बल्बची क्षमता असलेले हे मानवी शरीर क्रियायोगाच्या तीव्र सरावाने निर्माण होणारी लाखो वॅटची शक्ती सहन करण्यास सक्षम बनवले जाते.
तेव्हा या, आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनी, आपण स्वयं-कल्याणासाठी क्रियायोगी बनूया आणि आपल्या शरीराला आणि मनाला संपूर्ण विश्वाची आधारशीला असलेल्या महाप्राणशक्तीच्या अनंत आविष्कारांना व्यक्त करण्यास सक्षम करूया.
लेखिका- डॉ. (श्रीमती) मंजु लता गुप्ता
—