नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी नेतृत्व प्रदान समारंभ झाला. यात नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांची औपचारिक नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात गायकवृंदाने सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. श्री गणेशाचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाला शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर निवृत्त होत असलेल्या परिषदेकडून नव्या परिषदेकडे ध्वज सुपूर्द करण्यात आले. शपथविधी हा सोहळा कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला, ज्यामुळे उपस्थित सर्वांनाच रोमांचक अनुभव आला.
शाळेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त व संस्थापिका प्राचार्या सुमन दत्ता यांनी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या परिषद सदस्यांना बॅज प्रदान केले. मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी सिया झा, विद्यार्थी प्रतिनिधी धर्मेश सूर्यवंशी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी दुर्वा कुलकर्णी यांनी बदल घडवून आणण्याचा आपला संकल्प व्यक्त केला. तसेच जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले.
निवृत्त होत असलेल्या परिषद सदस्यांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भविष्यातील समाजाचे नेते घडविण्यासाठी विद्यार्थी परिषद निवडणूक व तिची स्थापना केली जाते. विद्यार्थ्यांना जबाबदारी स्वीकारण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडण्यासाठी त्यांना घडवले जाते.
या समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि शाळेबद्दलची आपुलकी अधिक दृढ झाली. या कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—