ईश्वरप्रदीप्त गुरू नश्वरतेने नाहीसे होऊ शकत नाहीत. ते मृत्यूच्या वेळी संपूर्ण जाणीवपूर्वक मानवी देहाचा त्याग करतात, या घटनेला महा-समाधी म्हणतात.
मार्च महिन्यात क्रियायोग परंपरेतील दोन अद्वितीय संतांच्या महा-समाधीचा स्मृतिदिन असतो – आध्यात्मिक श्रेष्ठ पुस्तक “योगी कथामृत” चे लेखक, श्री श्री परमहंस योगानंद यांचा 7 मार्च 1952 रोजी आणि त्यांचे गुरू, “कैवल्य दर्शनम् ” पुस्तकाचे लेखक, श्री श्री युक्तेश्वर गिरी यांचा 9 मार्च 1936 रोजी.
परंतु, दोन्ही गुरूंनी आपले शरीर त्यागण्यापूर्वी, त्या काळात हयात असलेल्या आणि भविष्यात येणाऱ्या अशा सर्व शिष्यांना आपल्या सर्वव्यापकतेचे वचन दिले. “अज्ञात रूपाने मी तुमच्या बरोबर असेन आणि अदृश्य बाहूंनी तुमचे रक्षण करेन,” असे योगानंदजींनी 97 वर्षांपूर्वी एका कवितेत लिहिले होते, आणि ते अनंतकाळासाठी त्यांच्या भक्तांच्या हृदयावर कोरले गेले आहे.
योगानंदजी सर्वप्रथम वयाच्या 17 व्या वर्षी बनारसमध्ये श्रीयुक्तेश्वरजींना भेटले. त्यांच्या हृदयात तेव्हा आपल्या गुरूंचा शोध घेण्याची तीव्र तळमळ होती. आणि बनारसच्या एका गल्लीत गुरू भेटल्यावर, योगानंदजी आपल्या गुरूंच्या कठोर शिस्तीस नम्रपणे एकनिष्ठ राहिले. पुढील वर्षांमध्ये जगद्गुरू बनण्यासाठी, श्रीयुक्तेश्वरजींनी त्या तरुण शिष्याला दहा वर्षे घडवले. त्यांचे महान गुरू श्रीयुक्तेश्वर गिरी यांनी अतुलनीय महावतार बाबाजींनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी दैवी रितीने पूर्ण केली – ती म्हणजे तरुण संन्याशाला समुद्रापलीकडे जाऊन पश्चिमेकडे क्रियायोगाचा प्रसार करण्यासाठी तयार करणे.
तोच क्रियायोग, जिथे 30 सेकंदांचा एक शक्तिशाली क्रिया श्वास नैसर्गिक मानवी उत्क्रांतीच्या एका वर्षासमान असतो. क्रियायोगाचा सर्वात मोठा पुरावा परमहंस योगानंदांची महासमाधी होती. मृत्यूनंतर 20 दिवसांनंतरही त्यांच्या शरीरावर विघटनाचे कोणतेही चिन्ह आढळले नाही. शवगृहाचे संचालक श्री. हॅरी टी. रो यांनी नोंद केली आहे की, परमहंस योगानंदांचे शरीर “अपरिवर्तनीयतेच्या विलक्षण स्थितीत” राहिले. महान गुरू, त्यांनी जीवनात जसे दाखवले होते, तसेच मृत्यूमध्येही मानवजातीला सिद्ध करत होते की, योग आणि ध्यानाद्वारे निसर्गाच्या शक्तींवर प्रभुत्व मिळवणे शक्य आहे.
“ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी” मध्ये वर्णन केल्यानुसार, क्रियायोग हा एक असा अभ्यास आहे, जो प्रत्येक श्वासाबरोबर रक्ताचे कार्बनमुक्तिकरण करतो, ज्यामुळे शेवटी शरीराचा क्षय रोखला जातो. ही एक प्राचीन विद्या आहे, जी कृष्णाने अर्जुनाला दिली होती आणि नंतर पतंजलि व इतरांना ज्ञात झाली. या युगात, महावतार बाबाजींनी ती लाहिरी महाशयांना दिली, ज्यांनी ती योगानंदजींचे गुरू, श्रीयुक्तेश्वर गिरी यांना दिली.
क्रियायोगाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी श्रीयुक्तेश्वरजींनी एका संस्थेच्या स्थापनेवर भर दिला. कारण, अशा शिकवणीचा प्रसार करणे आवश्यकच होते. म्हणूनच योगानंदजींनी 1917 मध्ये रांची येथे योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस) ची, आणि 1920 मध्ये लॉस एंजेलिस येथे सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप (एसआरएफ) ची स्थापना केली. योगदा आश्रमांमार्फत आत्म-साक्षात्काराच्या, घरी बसून अभ्यास करण्यासाठीच्या पाठमालेसाठी अर्ज करता येतो, ज्यात या ध्यानाच्या वैज्ञानिक प्रणालींवर प्राविण्य मिळवण्यासाठी टप्प्याटप्प्याने सूचना दिल्या आहेत.
परमहंस योगानंदांच्या शब्दांत, “मी गेल्यानंतर, ही पाठमालाच गुरू असतील. या शिकवणींद्वारे तुम्ही माझ्याशी आणि मला ज्या महान गुरूंनी पाठवले आहे, त्यांच्याशी एकसूर व्हाल.”
—