नाशिक : प्रतिनिधी
शाळा हे जगाच्या मोठ्या व्यासपीठावर घेऊन जाणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे विद्यार्थीदशेत भरपूर स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. यश मिळेलच असं नाही पण त्यासाठी प्रयत्न करा, मेहनत घ्या. नक्कीच एक दिवस तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात तुमचा व तुमच्या शाळेचा नावलौकिक वाढवाल असा विश्वास ठेवा. शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन कायम ध्यानात घ्या. त्या पद्धतीने स्वतःचा जीवन प्रवास करा, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी व दिव्यांग आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू मयूर देवरे यांनी केले. त्यांनी स्वतःच्या यशाचे गमक हेच असल्याचेही सांगितले.
तरुण ऐक्य मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (पंचवटी)च्या आठवी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचा क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून देवरे बोलत होते.
याप्रसंगी गीत मंचच्या विद्यार्थिनी व सोनाली कुलकर्णी यांनी स्वागतगीत म्हटले. पर्यवेक्षक काशिनाथ जोपळे यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्याध्यापक उमेश आटवणे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष बाबुराव मुखेडकर, शालेय समितीचे अध्यक्ष राहुल मुखेडकर, प्राचार्य सुधीर नवसारे, हर्षल खरोटे यांच्या उपस्थितीत पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विजेत्या, उपविजेत्या संघातील खेळाडूंना चषक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी दीपक भोईर यांनी हे चषक पुरस्कृत केले होते.
याप्रसंगी संस्था व शाळेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडाशिक्षक दीपक लभडे यांनी आभार मानले. मीनाक्षी चंद्रात्रे यांनी सूत्रसंचालन केले.
—