नाशिक : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्टचा 2025-26 या नवीन वर्षासाठीचा इन्स्टॉलेशन समारंभ केन्सिंग्टन क्लब येथे अत्यंत भव्य, अनुशासित आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या समारंभाला नाशिक शहरातील अनेक रोटेरियन, मान्यवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि क्लब सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व नोंदणीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भावीका पगारे यांनी भक्तिभावाने सादर केलेल्या गणेश वंदनेने वातावरण मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष रोटेरियन सोनल शाह व रोटेरियन मीनल केंगे यांनी केले. मावळते अध्यक्ष रोटेरियन आदित्य जाजू यांनी वर्ष 2024-25 मधील उल्लेखनीय उपक्रमांचा आढावा घेतला. आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे यांची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे रोटेरियन राम पगारे आणि त्यांची क्लब सचिव योगेश अहिरे आणि वीरेंद्र लोणारी यांच्याकडे सुपूर्त केली. त्याआधी रोटेरियन डॉ. नागेश डोलारे यांनी राम पगारे यांचा रोटरी व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा परिचय करून दिला.
नवीन अध्यक्ष रोटेरियन राम पगारे यांनी वर्ष 2025-26 साठीचे क्लब व्हिजन सादर करताना शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांतील शाश्वत प्रकल्पांची घोषणा केली. त्यांनी नवीन BOD (Board of Directors) सदस्यांची अधिकृत घोषणा केली.
या प्रसंगी क्लबमधील जिल्हा अधिकारी रोटेरियन यांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. डी. एम. गुजराथी, पी.पी. परेश चिटणीस व पी.पी. मनीषा विसपुते यांच्या मार्गदर्शनात आरोग्य तपासणी शिबिरे, करिअर मार्गदर्शन व अपंग साहित्य वितरण असे महत्त्वाचे प्रकल्प जाहीर झाले. विशेषतः यावर्षी वाचन संजीवनी या उपक्रमाचा प्रारंभ जिल्हा प्रमुख रोटेरियन ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी स्वतः एका वाचन पेटीचे प्रायोजकत्व स्वीकारून समाजात वाचनसंस्कृती वाढवण्याचे उदाहरण घालून दिले.
या समारंभात नवीन सदस्यांचा औपचारिक स्वागत समारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शंतनू गुने (संस्थापक – जागर मनाचा फाउंडेशन) यांचा परिचय पी.पी. परेश चिटणीस यांनी करून दिला. गुने यांनी मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि वैचारिक स्पष्टतेवर आधारित अत्यंत विचारप्रवर्तक मनोगत व्यक्त केले.
मुख्य अतिथी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन ज्ञानेश्वर शेवाळे यांचा परिचय एजी रोटेरियन दिलीप काळे यांनी करून दिला. शेवाळे सरांनी रोटरीच्या सात सेवा क्षेत्रांबद्दल, रोटरी फाउंडेशन व जागतिक अनुदानाबाबत माहिती देत क्लबच्या कार्याला दिशा व प्रेरणा दिली.
कार्यक्रमाचा समारोप सचिव (प्रकल्प) ॲड. विरेंद्र लोणारी यांनी उपस्थित सर्व पाहुणे, रोटेरियन सदस्य, संयोजक, कर्मचारी व क्लब कुटुंबाचे मनःपूर्वक आभार मानले.
—