नाशिक : प्रतिनिधी
जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम येथील रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दिनांक २७ व २८ फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजल्यापासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून यासाठी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.
सिव्हिल हॉस्पिटलसमोरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात २७ फेब्रुवारीला साधक दीक्षा आणि २८ फेब्रुवारीला उपासक दीक्षा देखील होणार आहे. भक्तगणाच्यावतीने या कार्यक्रमाचा जोरात प्रचार-प्रसार सुरू असून रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाशिकमध्ये येत असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळत आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य हे दक्षिण पिठाचे आचार्य असून त्यांचे अध्यात्मिक व सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अवयवदान हा उपक्रम राबवला जातो. आजमितीस १३३ अवयवदान करण्यात आले. मरणोत्तर १८० देहदान करून शासकीय महाविद्यालयाला हे देह सुपूर्द करण्यात आले आहे. यावर्षी अवघ्या पंधरा दिवसात एक लाख ११ हजार ४३४ वृक्षारोपण करण्यात आले. जीवनदान महाकुंभमध्ये एक लाख ७१ हजार रक्त बाटल्या अवघ्या १५ दिवसात जमा करून समाजासाठी हे रक्त शासकीय रक्तपेढीला देण्यात आले.
याबरोबरच अपघातग्रस्तांसाठी विनामूल्य ५३ ॲम्बुलन्स सेवा दिवसरात्र कार्यरत आहे. संस्थानाच्यावतीने सीबीएससी बोर्ड इंग्रजी माध्यम शाळा, ब्लड इन निड, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अनुयायामार्फत राबवले जातात. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समस्या मार्गदर्शन प्रवचन दर्शन सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उत्तर महाराष्ट्र उपपीठाच्यावतीने करण्यात आले आहे.
—
रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचा नाशिक येथे समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा
Get real time updates directly on you device, subscribe now.