नाशिक : प्रतिनिधी
साहित्य संमेलनाची सुरुवात प्राजक्त प्रभा कविता संग्रहाच्या प्रकाशन आणि काव्य वाचन कार्यक्रमातून होत आहे. या होणाऱ्या साहित्य संमेलनाचे आदरतिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून नाशिमध्ये होणारे हे साहित्य संमेलन अविस्मरणीय राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत आहे. या संमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा श्रीगणेशा आज अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ या काव्य संग्रहाचे प्रकाशनाने झाला. या काव्य संग्रहाचे प्रकाशन पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे पार पडले.