सार्वजनिक वाचनालयात कवी गोविंद दरेकर यांचा स्मृतीदिन भावपूर्ण वातावरणात साजरा

0

नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक वाचनालयात कवी गोविंद दरेकर यांचा स्मृतीदिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर होते. प्रमुख वक्ते म्हणून व्यवस्थापक दिलीप अहिरे होते. व्यासपीठावर प्रमुख सचिव सुरेश गायधनी, सहाय्यक सचिव प्रा. सोमनाथ मुठाळ , नाट्यगृह सचिव जयेश बर्वे, मंगेश मालपाठक, डॉ. धर्माजी बोडके आदी उपस्थित होते.
प्रारंभी कवी गोविंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन  करून अभिवादन करण्यात आले. दिलीप अहिरे यांनी कवी गोविंद यांच्या काव्यसंपदेचा आढावा घेत, त्यांच्या साहित्यिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या कवितांमधून देशप्रेम, सामाजिक जाणीव, मानवी मूल्ये आणि स्वातंत्र्याची तळमळ प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. साधी, ओघवती आणि जनमानसाला भिडणारी भाषा हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात कवी गोविंद यांच्या निवडक कवितांचे वाचन करण्यात आले. उपस्थित श्रोत्यांनी त्यांच्या ओजस्वी आणि प्रेरणादायी कवितांना उत्स्फूर्त दाद दिली. त्यांच्या साहित्यामुळे समाजात सकारात्मक विचारांची पेरणी झाली असून आजही त्यांच्या कविता तितक्याच प्रेरणादायी वाटतात, असे मत कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी व्यक्त केले.
प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी कवी गोविंद यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या साहित्याचा अभ्यास आणि प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. योगिनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख सचिव सुरेश गायधनी यांनी आभार मानले. यावेळी राधा राउत, कीर्ती नागरे, अनिता नगरकर, संजय रत्नपारखी, दिलीप बोरसे यांच्यासह वाचनालयाचे सदस्य, साहित्यप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.