म्हसरूळला प्रचार दौरा आटोपून परतलेल्या पेलमहाले दाम्पत्याचा ‘रिअल हिरो’ अवतार; आगीतून वाचवले अनेकांचे प्राण!

0
नाशिक : प्रतिनिधी

म्हसरूळ येथील मखमलाबाद लिंक रोडवरील गणेश अपार्टमेंटमध्ये बुधवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळांनी रौद्र रूप धारण केलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वंदना पेलमहाले आणि गणेश पेलमहाले यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे इमारतीतील अनेक रहिवाशांचे प्राण वाचवले. या धाडसी सुटकेनंतर रहिवाशांनी पेलमहाले दाम्पत्यासह अग्निशमन दलाचे टाळ्यांच्या कडकडाटात आभार मानले, तेव्हा सर्व जण भावूक झाले होते.

                           नेमकी घटना काय?
बुधवारी (दि. ७) रात्री ११ ते १२ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वंदना पेलमहाले यांचे पती गणेश पेलमहाले हे प्रचार दौरा आटोपून घरी परतले होते. नेहमीप्रमाणे बारा जोतिर्लिंग मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना, त्यांना शेजारील ‘गणेश अपार्टमेंट’च्या मीटर बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे दिसले. पाहता पाहता मोठा स्फोट झाला आणि आगीचे लोळ इमारतीच्या पार्किंग व जिन्यापर्यंत पसरले.

                  जिवाची पर्वा न करता मदतीला धावले
आग लागल्याचे लक्षात येताच पेलमहाले दाम्पत्याने क्षणाचाही विलंब न लावता इमारतीकडे धाव घेतली. त्यांनी आरडाओरड करून गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना जागे केले. जिन्यामध्ये धूर आणि आगीचे लोळ असतानाही, धडपड करून त्यांनी इमारतीमधील लोकांना सुखरूप बाहेर काढले. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, जिन्यातील स्लॅबचे प्लास्टरही कोसळले होते; मात्र पेलमहाले यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीत ६० ते ७० जण रहिवासी आहेत.
                    यंत्रणांची तत्परता आणि कृतज्ञता
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान अवघ्या ५ ते १० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सर्व रहिवासी सुरक्षित बाहेर आल्यानंतर, त्यांनी आपल्या रक्षकांसाठी टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त केली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या पेलमहाले दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.