परमहंस योगानंदांचा शाश्वत वारसा

(132 वी जयंती विशेष)

0

“आपले हे जग म्हणजे स्वप्नातले एक स्वप्न आहे. परमेश्वराचा शोध घेणे, हे आपल्या जगण्याचे एकमेव ध्येय व उद्दिष्ट आहे, याचा बोध प्रत्येकाला व्हायला हवा ” – श्री श्री परमहंस योगानंद.

परमप्रिय गुरू – श्री श्री परमहंस योगानंदांनी अनेकदा सांगितले आहे की, परमेश्वराचा शोध घेणे हे मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. इतर सर्व काही थांबू शकते, परंतु तुमचा ईश्वराचा शोध थांबू शकत नाही.
बंगालमधील गोरखपूर येथील ज्ञानप्रभा आणि भगवतीचरण घोष या धर्मपरायण दांपत्याच्या पोटी 5 जानेवारी, 1893 रोजी योगानंदजी म्हणजेच मुकुंदलाल घोष यांचा जन्म झाला. जेव्हा श्रीमती ज्ञानप्रभा छोट्या मुकुंदाला कुशीत घेऊन आपले गुरू लाहिरी महाशय यांच्या दर्शनास गेल्या, त्यावेळी त्या थोर गुरूंनी आशीर्वाद देताना हे कथन केले की, “माते, तुझा पुत्र एक योगी होईल, आणि एक अध्यात्मिक इंजिन बनून अनेक आत्म्यांना परमेश्वराच्या साम्राज्याकडे घेऊन जाईल.” त्यांची ही पवित्र वाणी येणाऱ्या काळात शब्दशः खरी ठरणार होती.
लहान असताना मुकुंदा, कालीमातेची खूप मनापासून भक्ती करायचा अन् ध्यान करायचा. अशाच एका प्रसंगी, तो गहन ध्यानात गुंग झाला असता त्याच्या अंतरंगी त्याला एक प्रचंड प्रकाशाचा झोत दिसला. तो अलौकिक प्रकाश पाहून अचंबित होऊन, त्याने विचारले, “हा विस्मयकारक प्रकाश कसला आहे?” या त्याच्या प्रश्नाला स्वर्गीय प्रतिसाद मिळाला, “मी ईश्वर आहे, मी प्रकाश आहे.” या अन्य जगातील अनुभवाविषयी योगानंदजींनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे, “या दैवी परमानंदाचा अनुभव हळूहळू क्षीण होत असताना, ईश्वर शोधण्याच्या प्रेरणेचा शाश्वत वारसा मी मिळवला.”
1910 साली, वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांनी ईश्वराचा शोध घेण्याच्या आध्यात्मिक प्रवासास सुरुवात केली. या शोधाने त्यांना त्यांचे पूज्य गुरू स्वामी श्रीयुक्तेश्वरजी यांच्यापर्यंत नेले. त्याच्या गुरुंच्या प्रेमळ पण कठोर मार्गदर्शनाखाली, त्यांनी स्वामी परंपरेतील पवित्र संन्यास स्वीकारला आणि स्वामी योगानंद हे नाव धारण केले; जे ईश्वराशी तादात्म्य साधल्याने लाभणाऱ्या सर्वोच्च आनंदाच्या प्राप्तीचे द्योतक आहे.
1917 मध्ये, त्यांनी रांची येथे योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (YSS) आणि 1920 मध्ये लॉस एंजेलिस येथे सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप (SRF) ची स्थापना केली. या दोन संस्थांचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे आत्म्याचे ईश्वराशी मिलन व्हावे, हे जीवनातील अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राचीन अध्यात्मिक ‘क्रियायोगा’च्या वैज्ञानिक ध्यानतंत्राचा प्रसार करणे हे आहे. वाय.एस.एस. आश्रमाकडे विनंती केल्यास त्यांच्याकडून अभिलाषी व्यक्तींना स्वत: महान गुरुंनी लिहिलेल्या गृह-अभ्यासाचे पाठ मिळू शकतात.
अमेरिकेत असताना, योगानंदजींनी वर लिहिलेल्या भारतीय आध्यात्मिक पद्धतींच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अथक परिश्रम केले. त्याचे खूप स्वागतही झाले आणि कौतुकही झाले. आपला ईश्वरासाठी केलेला शोध इतरांना माहीत करुन देण्याच्या उत्कंठेने प्रेरित होऊन, त्यांनी अत्यंत प्रशंसित आध्यात्मिक कलाकृती “योगी कथामृत” हे आत्मचरित्र लिहिण्याचे कार्य हाती घेतले. या पुस्तकाचा जगभरातील असंख्य व्यक्तींवर सखोल परिणाम झाला आहे आणि आता ते 50 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.
त्यांच्या सर्वांगीण शिकवणींचा लक्षावधी लोकांवर खोलवर प्रभाव पडला आहे. या शिकवणींमध्ये विविध विषय विस्तृतपणे सामावले आहेत, विशेषत: 1) ”क्रियायोग” ध्यानाचे विज्ञान, जे राजयोगाचे प्रगत तंत्र आहे आणि जे मानवी जाणिवेला आकलनाच्या उच्च स्तरावर नेते. 2) सर्व सत्य धर्मांमध्ये खोलवर रुजलेली एकता आहे. 3) शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हित असलेले संतुलित जीवन प्राप्त करण्याचे मार्ग.
आदरणीय जगद्गुरू योगानंदजी आता भारताची प्राचीन शिकवण विश्वभरात प्रसारित करणारे सर्वात प्रभावी राजदूत म्हणून ओळखले जातात. योगानंदांचे जीवन आणि शिकवण, जात, संस्कृती किंवा श्रद्धा या पलीकडे जाऊन सर्व स्तरातील लोकांसाठी, प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे चिरंतन स्त्रोत आहेत.
अधिक माहिती: yssi.org 
लेखिका: रेणू सिंग परमार.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.