आज आंतरराष्ट्रीय योग दिवस. भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने युनो कडून आजचा दिवस ” योग दिवस” म्हणून मान्य करून घेतला. त्याला आता नऊ वर्ष झालीत. त्यामुळे योग, व योगाचे महत्त्व याची खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता रुपी मोहर उमटली. त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार, मानावे तितके कमीच आहेत.
खरंतर, कुठलीही घटना एका रात्रीतून उदयास येत नाही. अनेकांच्या कार्याची आहुती त्यात पडलेली असते.
” ज्ञान देवे रचिला पाया, तुका झालासी कळस.” या उक्तीप्रमाणे योगाचे आंतरराष्ट्रीय करणाच्या योगप्रवाहात अनेक स्वयंप्रकाशीत तारे काळाच्या उदरात लुप्त झाले. अश्या दिव्य तारकां मध्ये लोणावळयाचे स्वामी कुवलानंद, सांताक्रुज योग सौंस्थेचे स्वामी योगेन्द्र, डिझाईन लाईट सोसायटीचे सुपरीचीत स्वामी शिवानन्द आणि अशी अनेक वलायांतिकत तारे कालप्रवासात विलीन झाले. अशाच एका काल समुद्रात खोल-खोल तळाशी लपलेलया तेजस्वी नररत्नाची व योग मार्गावरील “मैलाचा दगड “झालेल्या दैदीत्यमान ताऱ्याचीओळख करून घेऊया.
सन १९२० मध्ये एक २७ वर्षे वयाचा एकटा तरुण, अमेरिकेतील बोस्टन ह्या शहरात आयोजित, सर्वधर्मपरिषदेला उपस्थित राहतो, अन् आपल्या प्रेरणादायी भाषणाने सर्वांना संमोहित करतो, प्रभावित करतो. तो तरुण संन्यासी म्हणजे “परमहंस योगानंद.” आपल्या गुरूच्या आज्ञेप्रमाणे योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ते अमेरिकेत आले. सन १९२० मध्ये त्यांनी सेल्फ रिलायझेशन फेलोशिपची अमेरिकेत स्थापना केली. त्याआधीच भारतात त्यांनी सन १९१७ मध्ये योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया, रांची येथे स्थापन केलेली होती. गुरू आज्ञा शिरसावंध्य मानून अमेरीकेत परमहंस योगानंद संघटितपणे योगाचा प्रचार व प्रसार करत होते. त्या काळात त्यांनी पूर्ण अमेरिका, व युरोपीय राष्ट्रांमध्ये अनेक दौरे केले. व्याख्याने आयोजित केली, व त्याबरोबरच योगासनांचे जाहीर प्रदर्शन सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी आयोजित केले.
स्टेजवर प्रेक्षकांमधिल एखाद्या डॉक्टरला बोलावणे, त्यांना योगानंदांची नाडी चेक करायला लावणे, एका हाताची नाडी बंद, तर दुसऱ्या हाताची नाडी अतितीव्र( High pulse rate), स्टेजवर श्वास, नाडी, व हृदय टप्प्याटप्प्याने बंद करून दाखविणे, हे सर्व प्रयोग योगानंद करून दाखवित, ते पाहून डॉक्टर डोक्याला हात लावून घेत असे, व its impossible असे पुटपुटतच डॉक्टर महाशय स्टेजवरून खाली उतरत असत, सहा- सहा निग्रो पैलवानांना एका हाताने स्टेजवरून लोटून देणे, अशा त्यांच्या अनेक आश्चर्यकारक प्रयोगाने योगाबद्दल कुतुहूल व आकर्षण पाश्चिमात्य जगात निर्माण झाले. लाखो पाश्चिमात्त्य लोक योगाचे शिक्षण घेऊ लागले,त्यामुळे त्यांना त्या काळात “Father of Yoga in West “असे प्रेमाने व आदराने म्हणत असत. सन १९२० ते १९५२ या संपूर्ण काळात त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत योगाचा प्रचार व प्रसाराचा झंजावात उभा केला. “योग चित्त- वृत्ति निरोध” – योग म्हणजे चित्त वृत्तींचा निरोध. योगामुळे शरीर ,व मन बलवान होते, हे त्यांनी त्यांच्या जीवन काळात पाश्चिमात्य जगाला दाखवून दिले. योगाचा लावलेला हा वेल आता गगनावरी गेला. पश्चिमेकडे योग सर्वसामान्य जनांपर्यंत त्यांनी पोहोचवला. योग आता बऱ्याच लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता. योग मुनी “पतंजलींचा अष्टांग योगाची” बीज आंतरराष्ट्रीय स्तरावर रोवण्याचं काम परमहंस योगानंदांनी केलं. निस्वार्थ भावनेने त्यांनी योगाचा विशेषता, क्रिया योगाचा प्रचार व प्रसार पाश्चिमात्य जगात केला.सेल्फ रिलायझेशन सोसायटी, लॉस एंजेलिस, मार्फत जगात १७५ देशात ५०० पेक्षा जास्त केंद्रे कार्यरत असून, भारतात योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया, रांची मार्फत चार आश्रम व २०० पेक्षा जास्त ध्यान केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी योग व विशेषता क्रिया योगाचा अभ्यास केला जातो व प्रशिक्षण दिले जाते.
सन १९४६ मध्ये योगगुरु परमहंस योगानंदानी “ऑटोबायो ग्राफी ऑफ ए योगी ” हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले. उच्च दर्जाच्या योग्याची, विचारांची दिशा व स्पंदन काय लेव्हलवर असू शकते हे या पुस्तकातून आपल्याला दिसते. या शतकातील सर्वोत्तम 100 पुस्तकांपैकी ते एक आहे. हे पुस्तक सतत” बेस्ट सेलिंग स्पिरिच्युअल बुक “आहे. अॅपलचे स्टीव जॉब्स यांनी, त्यांच्या आयपॅड मध्ये हे पुस्तक ठेवलेले होते, व सतत ते त्याचे वाचन व मनन करत असत. स्वतःच्या अंत्ययात्रेत सामील झालेल्या सर्वांना हे पुस्तक त्यांनी भेट म्हणुन
देणयाची व्यवथा करून ठेवली होती. जगातील व भारतातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित झालेले हे पुस्तक आहे. एका सुखवस्तू तरुणाचा अध्यात्माच्या वाटेवरचा प्रवास त्यात अलगदपणे उलगडला आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी राज योगातील उच्च प्रकार म्हणजेच ‘क्रियायोग” यावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे.
क्रियायोग : हा प्राणायामाचा सूक्ष्म प्रकार असून खूपच उच्च दर्जाचा ‘राजयोग’ आहे. महावतार बाबाजी, लाहिरी महाशय, स्वामी श्री युक्तेश्वर गिरी, व परमहंस योगानंद अशी क्रिया योगाची गुरु परंपरा आहे.निवृती नंतर किंवा वृद्धापकाळात कृती व विचार यांचे प्रमाण विषम असते,म्हणून काही व्यक्ती विचार व कृती यांचा समन्वय साधावा म्हणून स्वतःला काही ना काही कामात/ व्यापात गुंतवून घेतात.स्पेसएकसचे(Spacex) चे ईलॅान मस्क, ज्या पद्धतीने अंतराळात रॅाकेट पाठवतात, व पृथ्वीवर त्याच ठिकाणी ते तो परतही आणतात, अशी ही अशक्यप्राय गोष्ट त्यांनी करून दाखविली, त्याच प्रकारे क्रिया योगाद्वारे विचार पाहिजे त्या ठिकाणी (परमेश्वर चरणी) पाठवून परत आपल्या मूळ स्थानी( मेंदूत) आणता येतात. त्यामुळे विचारांची ताकद प्रचंड वाढते, व E= mc२ या आईन्स्टाईनच्या सूत्राप्रमाणे विचार हे पदार्थामध्ये घनीभूत करता येतात किंवा vice versa याचा प्रत्यय क्रिया योगाद्वारे उच्च श्रेणीच्या साधकांना येतो. वृद्धापकाळातील “विचारी मना, सतत गुंतोनी राहे, सदासर्वकाळी चिंतित राही ” ही मनाची/ विचारांची अवस्था टाळणे या योगामुळे शक्य होते.
योगाचा प्रभाव परमहंस योगानंद यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही जगाला दाखवून दिला. अमेरिकेतील भारतीय राज दुताच्या सत्कार समारंभात भाषण करताना व अखेरीस भारतमातेचा महिमा गात-गात योगनंदानी देह ठेवला. त्यावेळेस मृत्यूनंतर सुद्धा त्यांचे शरीर अत्यंत टवटवीत, ताजे व प्रसन्न होते. मृत्यूची कुठलीही छाया त्यांच्या देहावर दिसत नव्हती, म्हणून तब्बल 20 दिवस त्यांचा देह अमेरिकन प्रशासनाने under observation ठेवला, तरीही त्यांच्या शरीरावर मृत्यूच्या कुठल्याही पाऊलखुणा उमटल्या नाहीत व सर्वसाधारण व्यक्तीचे मृत्यूनंतर ,त्याच्या शरीराचे जसे विघटन होते किंवा कुजते अशा प्रकारची कुठलीही घटना त्यांच्या मृत शरीरात दिसली नाही, व अशा प्रकारचे “Affidavit” प्रशासनाने करून दिले,व त्यानंतरच त्यांचे अंत्यविधीची प्रक्रिया व सोपस्कार पार पाडण्यात आले. “जिंदगी के साथ भी, और जिंदगी के बाद भी” योगाचे महत्व दाखविणाऱ्या महान योग्याला आजच्या पवित्र दिनी विनम्र अभिवादन. ह्या महान योगावताराच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने सन १९७७ मध्ये व त्यानंतर सन२०१७ मध्ये डाक तिकीट त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रकाशित केले. २०१९ मध्ये १२५ रुपयाचे नाणे त्यांच्या नावाने प्रसिद्ध केले. आज सुद्धा त्यांनी आखून दिलेल्या मूल्यांवर व मानदंडांवर सेल्फ रिलायझेशन सेंटर व योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया या दोन्ही संस्था सलग एकशे तीन वर्षापासून
आजतागायत जोमाने योग प्रसाराचे कार्य टवटवीतपणे व तरतरीतपणे करीत आहेत, व लाखो लोकांचे आयुष्य उजळवीत आहेत.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने परमहंस योगानंद यांच्या योग प्रसाराच्या मैलाचया दगड ठरलेलया कार्याला मानाचा त्रिवार मुजरा.!!!
उघते नम: उदायते नम: उदिताय नमः
विराजते नम: स्वराजे नम: सम्राजे नम:
– दिलीप भदाणे
नाशिक
—