पुन्हा एकदा नृत्यालीने भारतीय झेंडा अटकेपार फडकवला

0
नाशिक  : प्रतिनिधी
येथील नृत्याली संस्थेने आंतरराष्ट्रीय पातळीवर शानदार कामगिरी केली आहे. सिंगापूर डान्स अलायन्सतर्फे आयोजित प्रतिष्ठित इंटरनॅशनल आर्ट्स फेस्टिव्हल 2025 मध्ये नृत्यालीने सर्व श्रेणींमध्ये प्लॅटिनम पुरस्कार मिळवत भारताचे नाव उज्ज्वल केले.
ही स्पर्धा दरवर्षी थायलंड, मलेशिया,  फिलिपाइन्स, इंडोनेशिया आणि सिंगापूर येथे आयोजित केली जाते. ज्यात जगभरातील २००० नृत्यसंघ सहभागी होतात.
यंदा नृत्यालीच्या विद्यार्थिनींनी ग्रुप परफॉर्मन्स, तीन सोलो, एक ड्युओ, आणि एक ट्रायो अशा विविध प्रकारांमध्ये सादरीकरण करून सगळ्यांनी पदके जिंकली. त्यापैकी  सृजना राक्षे  हिच्या सोलो परफॉर्मन्सला आणि नृत्यालीच्या ग्रुप परफॉर्मन्सला प्रत्येकी प्लॅटिनम कप मिळाला असून, एकूण दोन प्लॅटिनम कप असा बहुमान नृत्यालीने पटकावला आहे.
विजयी चमूत सहभागी झालेल्या विद्यार्थिनी अशा :
चिन्मयी मराठे, राधिका गढवाल, अनुश्री ढाके, श्रुती ढाके, गायत्री दुसाने, श्रिया जांबोटकर, दिया पाटील, सृजना राक्षे, श्रावणी राक्षे, निष्ठा बॅनर्जी, बबली बॅनर्जी, पूनम राठी आणि अवनी नायर. या सर्वांनी उत्कृष्ट नृत्यप्रदर्शनाद्वारे भारतीय नृत्यकलेचं सौंदर्य जगासमोर मांडले.
संस्थेच्या संस्थापिका गुरु सोनाली करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यालीने गेल्या काही वर्षांत सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१९ मध्ये इटली येथे झालेल्या वर्ल्डकप ऑफ फोकलोरमध्ये नृत्यालीने वर्ल्डकप मिळवला होता.
तसेच २०२३ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या स्पर्धेत गोल्ड कप आणि विविध पदके जिंकून नृत्यालीने पुन्हा एकदा आपली छाप पाडली होती.
नृत्यालीच्या या ऐतिहासिक विजयात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे, सोनाली करंदीकर यांना आउटस्टँडिंग टीचर ॲण्ड कोरिओग्राफर हा विशेष सन्मान बहाल करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या समर्पण, नृत्यदिग्दर्शन आणि विद्यार्थिनींना दिलेल्या प्रेरणादायी शिक्षणाचा गौरव आहे.
२०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर विजयाची हॅटट्रिक करत नृत्यालीने भारताचा अभिमान वाढवणारा हा प्लॅटिनम क्षण आपल्या नावे केला आहे. नाशिकच्या नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीसोबत कीर्ती शुक्ल यांचा कथकचा नृत्यसंघ देखील सहभागी होता. दोन्ही संघांनी प्लॅटिनम अवॉर्ड भारताला मिळवून दिले. संपूर्ण नाशिककरांसाठी हा अभिमानाचा, आनंदाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे.
या प्रवासाचे नियोजन आणि संपूर्ण टूरचे आयोजन अक्यूब हॉलिडेस ॲण्ड इव्हेंटस् यांच्या अभिजीत धारणकर आणि प्रिया करंदीकर यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडले. त्यांच्या सहकार्यामुळे नृत्यालीच्या विद्यार्थिनींना हा अमूल्य आंतरराष्ट्रीय अनुभव मिळाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.