नाशिक : प्रतिनिधी
योगा फाउंडेशन संचलित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या नाशिक जिल्हा समितीतर्फे योगशिक्षकांसाठीचे योगोत्सव 2024 हे जिल्हास्तरीय संमेलन आज (रविवार, दि.17 मार्च) होणार आहे. चिन्मय मिशन आश्रम, चिंचबन, मालेगाव स्टॅडजवळ, पंचवटी येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान हे संमेलन भरणार आहे. यात जिल्हाभरातून योगशिक्षक सहभागी होतील. संघाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन होत आहे.
सकाळी नऊ ते साडेनऊ दरम्यान सूक्ष्म हालचाली करून घेण्यात येतील. सकाळी साडेनऊ ते 10 वाजेदरम्यान स्वागत व नोंदणी, तसेच अल्पोपाहार असेल. सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान उदघाटन समारंभ होईल. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे डॉ. जयदीप निकम, योग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश वाघ, आयुर्वेदाचार्य सौरभ जोशी, संमेलनाध्यक्ष राहुल येवला, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख व प्राचार्य यू. के. अहिरे, राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष जिवराम गावले, योगाचार्य व माजी संमेलनाध्यक्ष अशोक पाटील उपस्थित असतील.
सकाळी 11 वाजता डाॅ. जयदीप निकम हे योग संघटना महत्व, व्याप्ती व आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी 12 वाजता, योग एक संशोधनात्मक आव्हान या विषयावर डाॅ. नीलेश वाघ यांचे व्याख्यान आहे. दुपारी दोन वाजता, वैद्य सौरभ जोशी यांचे योगिक जीवनातील आहाराचे महत्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी तीन ते सायंकाळी साडेचार दरम्यान आदर्श योगशिक्षकांचा सन्मान, संमेलनाध्यक्षांचे मनोगत, प्रायोजक, योगासन स्पर्धेतील परीक्षक व तांत्रिक अधिकारी यांचा सत्कार, तसेच योगासन स्पर्धेतील स्पर्धकांचे बक्षीस वितरण होणार आहे. चहापानानंतर समारोप होईल.
—