नाशिकचा सुपुत्र आता ‘दिल्ली दरबारी’; शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकारलेल्या पुतळ्याचे राष्ट्रपती भवनात अनावरण

0

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या ऐतिहासिक मातीतील कलेचा सुगंध आता थेट देशाच्या सर्वोच्च वास्तूमध्ये म्हणजे ‘राष्ट्रपती भवनात’ दरवळला आहे. नाशिकचे सुपुत्र आणि दिल्ली दरवाजा परिसरातील रहिवासी असलेले सुप्रसिद्ध शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकारलेल्या चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. नाशिकच्या एका कलाकाराचा ‘दिल्ली दरवाजा ते दिल्ली दरबार’ असा हा प्रवास खऱ्या अर्थाने विलोभनीय आणि प्रेरणादायी ठरला आहे.

                    दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा
राष्ट्रपती भवनात आयोजित या विशेष सोहळ्याला देशातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती. यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आदींचा समावेश होता.
या सर्व मान्यवरांसोबत मंचावर उपस्थित राहून संवाद साधण्याची संधी संदीप लोंढे यांना मिळाली. त्यांच्या कलेचे कौतुक करताना या दिग्गजांनी त्यांच्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, हा संपूर्ण नाशिककरांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.
कलेचा वारसा आणि लोंढे घराण्याचा सन्मान
संदीप लोंढे यांनी आपल्या कलेच्या जोरावर लोंढे घराण्याच्या ‘कला मंदिराचा’ कळस आज चढवला आहे. गोदेच्या काठावरील गल्ल्यांमधून सुरू झालेला हा प्रवास आज देशाच्या राजधानीत मानाचे स्थान मिळवून गेला आहे. त्यांच्या या यशामुळे नाशिकच्या कलाविश्वात आनंदाचे वातावरण असून, हा वारसा पुढची पिढी अधिक जोमाने पुढे नेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. “नाशिकच्या मातीत जन्मलेल्या एका कलाकाराने साकारलेले शिल्प जेव्हा राष्ट्रपती भवनाची शोभा वाढवते, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण शहराचा विजय असतो. संदीपचा हा प्रवास जिद्द आणि चिकाटीचे उत्तम उदाहरण आहे.”, अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व मित्र परिवारामध्ये व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.