नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळ गाव व काॅलनी परिसरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. म्हसरूळ – मखमलाबाद लिंकरोडवरील श्री गुरुस्थान, बारा ज्योतिर्लिंग धाम येथे बुधवारी (दा.26) विविध कार्यक्रम झाले. मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते. भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सामाजिक कार्यकर्ते गणेश पेलमहाले व वंदना पेलमहाले यांनी या उत्सवाचे संयोजन केले.
मंदिरात विधी वाचन महाआरती करण्यात आली. बारा ज्योतिर्लिंगांची सजावट केली होती. ज्योतिर्लिंग पूजन करण्यात आले. भाविकांनी बेलपत्र, फुले व कवठ फळ वाहिले. हवनकुंड प्रज्वलित केले होते. महिलांनी शिवस्तुतीपर भजने गायली. भाविकांकडून सतत ओम नमः शिवायचा जयघोष करण्यात येत होता. येथे दर्शनासाठी दिवसभर रांगा होत्या.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या म्हसरूळ सेवा केंद्रातर्फे मंदिर परिसरात राजयोगाची माहिती भाविकांना देण्यात आली. त्यासाठी त्यांनी माहितीपर फलक लावले होते. भाविकांनी त्याला प्रतिसाद दिला.
उत्सवाला आराधना संगीत विद्यालय यांच्याकडुन भक्ती संगीताची सेवा देण्यात आली. ज्यामुळे सर्व परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. प्रसाद वाटपात भाविकांनी सहभाग घेतला. त्यांनी यथाशक्ती राजगिरा लाडू वाटप केले. सर्व भाविकांचे श्री गुरुस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने गणेश पेलमहाले व वंदना गणेश पेलमहाले यांनी स्वागत व आभार मानले.
—