म्हसरूळला जनतेने सुचवलेलेच उमेदवार रिंगणात; नेत्यांचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला

0

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ) मध्ये शिवसेना (शिंदे गट) पक्षाने आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दिंडोरी रोडवर भव्य बाईक रॅली काढत विरोधकांना तगडे आव्हान दिले आहे. ‘खिच के ताण… धनुष्यबाण’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
या रॅलीत आमदार हिरामण खोसकर आणि माजी आमदार जयंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना हिरामण खोसकर यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “गेल्या नऊ वर्षांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी जनता आता रस्त्यावर उतरली आहे. ही लढत ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशी आहे. १८ वर्षांच्या तरुणांपासून ७० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, शहरात ८० टक्क्यांहून अधिक जागांवर आमचेच उमेदवार विजयी होतील.” लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे उमेदवार दिल्याने परिवर्तनाची लाट आल्याचेही त्यांनी नमूद केले.

                परिवर्तन अटळ: जयंत जाधव
माजी आमदार जयंत जाधव यांनी नाशिकमधील वाढती गुंडागर्दी आणि रस्ते विकासाच्या मुद्द्यावर लक्ष वेधले. “आगामी कुंभमेळा तोंडावर आहे, मात्र शहरात सर्वसामान्यांना चालण्यासाठी रस्ते उरलेले नाहीत. ही मुजोरगिरी मोडीत काढण्यासाठी आम्ही जनतेने सुचवलेलेच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीत सत्तांतर अटळ आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उमेदवारांचा ताफा आणि उत्साह
शिवसेना (शिंदे गट) तर्फे प्रभाग १ मधून नयना (करुणा) रामवंशी (१अ), गणेश चव्हाण (१ब), उर्मिला निरगुडे (१क) आणि प्रवीण जाधव (१ड) हे नशीब आजमावत आहेत. उघड्या जीपमधून उमेदवारांनी मतदारांना अभिवादन केले. असंख्य महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीत सहभागी होऊन प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. या भव्य शक्तिप्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावत निवडणुकीत रंगत निर्माण केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.