“ध्यान हे आत्म्याचे अनंत ब्रह्म किंवा परमेश्वराशी पुनर्मीलन घडवणारे विज्ञान आहे. नियमित आणि गहन ध्यान केल्याने आपला आत्मा जागृत होईल…” — परमहंस योगानंद
आजचे जग अविरत वेगाने धावत आहे. तणाव, संघर्ष आणि अनिश्चितता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. अशा काळात ध्यान हे आता विलासाची गोष्ट किंवा केवळ आध्यात्मिक कुतूहल राहिलेले नाही—ती जीवनरेखा आहे. जगाला क्रियायोगाची प्राचीन प्रणाली प्रदान करणारे अग्रणी योगी, श्री श्री परमहंस योगानंद, यांच्याइतक्या स्पष्ट आणि सार्वत्रिक रितीने ध्यानाचे विज्ञान व त्याची गहनता उलगडून सांगणारे आध्यात्मिक गुरू फार थोडे आहेत.
योगानंदजींचे 1920 साली अमेरिकेत आगमन झाले आणि तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी हे शिकवले की शाश्वत शांती व आनंद हे भौतिक संपत्ती, प्रतिष्ठा किंवा बाह्य यश यांमुळे प्राप्त होऊ शकत नाहीत. अशी शांती व आनंद केवळ तेव्हाच प्राप्त होतात, जेव्हा व्यक्ती अंतर्मुख होऊन ध्यानाद्वारे मन स्थिर व शांत करणे शिकते. त्यांचे कालजयी पुस्तक ‘Autobiography of a Yogi’ (मराठी: ‘योगीकथामृत’) याने — विश्वनेते, शास्त्रज्ञ, कलाकार, उद्योजक — अशा कोट्यवधी लोकांना प्रेरित केले आहे आणि ते सर्वकालातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या आध्यात्मिक पुस्तकांपैकी एक आहे.
आपल्या शिकवणींचे जतन आणि प्रसारण करण्यासाठी त्यांनी दोन भगिनी संस्थांची स्थापना केली : पश्चिमेत सेल्फ-रिअलाइझेशन फेलोशिप (SRF) आणि भारतात योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (YSS). या दोन्ही संस्था जगभरातील मुमुक्षूंना ध्यान-प्रणाली, पाठमाला, एकांतवास शिबिरे (रिट्रीट्स) आणि मार्गदर्शन सातत्याने प्रदान करीत आहेत. या उपदेशांच्या केंद्रस्थानी क्रियायोग — एक वैज्ञानिक ध्यान-प्रणाली — आहे, जी मज्जासंस्थेला शांत करून आणि आपल्या प्राणशक्तीला उच्चतर जाणिवेच्या अवस्थांकडे वळवून आध्यात्मिक उन्नतीला गती देते. इच्छुकांसाठी SRF/YSS च्या आश्रमांमध्ये ध्यान-पाठमाला उपलब्ध आहे.
योगानंदजींनी शिकवल्याप्रमाणे, ध्यान ही आत्म्याचे परमात्म्याशी ऐक्य साधण्याची एक वैज्ञानिक प्रणाली आहे. म्हणजेच, ईश्वराला जाणण्यासाठी उपयोगात आणली जाणारी एकाग्रता म्हणजे ध्यान. आणि ही साधना आंतरिक अनुभवातून प्रत्यक्ष होते. ध्यानात प्रेम, मनःशांती, शांतता किंवा परमानंद उदयाला येतो तेव्हा, ते आपल्या आत्म्याला ईश्वराचा स्पर्श असल्याचे द्योतक असते—कारण अंतरंगातील स्तब्धतेच्या अशा अवस्थांमध्ये तो स्वतः प्रकट होतो. ध्यानात “नित्य नूतन आनंद” म्हणून ईश्वरतत्त्वाचाच अनुभव येऊ शकतो.
परमहंस योगानंदजी म्हणाले, “दररोज, गहनतेने आणि सातत्याने ध्यान केल्यास, नित्य विद्यमान, नित्य जागृत, नित्य नूतन आनंद तुमच्यामध्ये अधिकाधिक प्रकट होत असल्याचे तुम्हांला जाणवेल. आणि सरावाने तो आनंद कामात व्यस्त असताना तसेच मौन असतानाही तितक्याच प्रमाणात तुमच्यासोबत राहील.” आपण ज्याचा शोध घेत आहोत — तो नित्य नूतन आनंद हाच नाही काय?
म्हणूनच आजच्या काळात परमहंस योगानंदजींचे उपदेश विशेषतः प्रासंगिक असल्याचे जाणवतात. जागतिक तणाव, मानसिक आरोग्याशी संबंधित संघर्ष आणि माहितीचा अतिरेक हे सर्वव्यापी झाले असताना, त्यांचा संदेश हे स्मरण करून देतो की उपाय बाहेर कुठेही नाही—तो आपल्या आत आहे. ध्यान हे केवळ संन्यासी किंवा ऋषी-मुनी यांच्यापुरते मर्यादित नाही; ती कोणत्याही बाह्य आव्हानांना तोंड देत असतानाही संतुलन, एकाग्रता आणि आनंद पुनर्स्थापित करण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे.
जग ‘जागतिक ध्यान दिन’ साजरा करत, अंतर्मनातील शांतीच्या सर्वव्यापी गरजेवर चिंतन करत असताना, योगानंदजींचा स्वर नव्या प्रासंगिकतेने प्रतिध्वनित होतो; कारण त्यांनी केवळ विश्रांतीपेक्षा अधिक गहन असे काही प्रदान केले : ईश्वराशी तादात्म्याद्वारे शाश्वत आंतरिक शांती व आनंद साध्य करण्याची एक सुस्पष्ट, वैज्ञानिक ध्यानपद्धत.
या कोलाहल व विभाजनाच्या युगात त्यांच्या शिकवणी शांत, अढळ दीपस्तंभाप्रमाणे उभ्या आहेत. आपण विसरलेल्या स्थिरतेकडे, मनःशांती आणि परमानंदाच्या अंतःकरणातील पवित्रस्थानाकडे, त्या आपल्याला पुन्हा बोलावत आहेत.
—
ध्यान : योगानंदांचा ईश्वराकडे नेणारा मार्ग
Get real time updates directly on you device, subscribe now.
Prev Post
स्केटिंग स्पर्धेत सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रीयस्तरावर यश
Next Post