नाशिक : प्रतिनिधी
बालचित्रकार मयुरेश आढाव याचा त्याच्या चित्रकलेतील कौशल्याबद्दल कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. फ्रावशी टाऊन अकॅडमी येथे माजी विद्यार्थ्यांचा एक संस्मरणीय स्नेहमेळावा नुकताच झाला. याप्रसंगी हा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, फ्रावशी ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष रतन लथ, उपाध्यक्षा शर्वरी लथ, व्यवस्थापकीय विश्वस्त मेघना बक्षी, माजी विद्यार्थी जितेंद्रसिंह रावल, शैक्षणिक संचालक प्राजक्ता जाडे आदी उपस्थित होते.
जयकुमार रावल यांनी याच अकॅडमीत सध्या इयत्ता नववीत शिकत असलेल्या बालचित्रकार मयुरेश आढाव याचे कौतुक केले. रतन लथ यांनीही मयुरेशच्या कौशल्याचे कौतुक केले. एवढेच नव्हे तर त्याची तुलना भविष्यातील एम. एफ. हुसेनसारख्या महान कलाकाराशी केली. मयुरेशचे चित्रकलेतील माध्यम जसे वॉटरकलर, ऑइल कलर, ॲक्रेलिक्स, पेन्सिल स्केचेस, सॉफ्ट पेस्टल्स आदींवर त्याचे प्रभुत्व आहे. अगदी लहानपणापासूनच, मयुरेशने आपल्या कल्पनाशक्तीला प्रत्यक्षात आणून, बारकावे, भावना , नैसर्गिक तसेच सांस्कृतिक समृद्धीने भरलेल्या चित्रांतून सर्वांना प्रभावित केले आहे.
—