महावतार बाबाजी स्मृतिदिनी सामूहिक क्रियायोग

0

नाशिक : प्रतिनिधी
ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी (योगी कथामृत) या जगप्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक श्री श्री परमहंस योगानंदद्वारा स्थापित योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या नाशिक ध्यान मंडळीद्वारा महावतार बाबाजी स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्यान मंडळीचे मुख्य ध्यान केंद्र, ५२, सोहम बंगला, सहजीवन कॉलोनी, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी योगदा सत्संग सोसायटी चे संस्थापक श्री श्री परमहंस योगानंद यांच्या शिकवणीवर आधारित सामूहिक क्रियायोग ध्यान, भजन आणि प्रार्थना यांचे आयोजन करण्यात आले. परिसरातील अनेक भक्तगणांनी कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेऊन श्री श्री महावतार बाबाजी यांच्या प्रति आपली श्रद्धा व्यक्त केली.
द्वापारयुगात श्रीकृष्णाने अर्जुनाला ईश्वप्राप्तीसाठी सांगितलेली  क्रियायोग साधना कलियुगात लुप्त झाली होती. त्या क्रियायोग साधनेचे श्री श्री महावतार बाबाजी यांनी पुनरुत्थान केले आणि श्री श्री लाहिरी महाशय यांच्या मार्फत जगाला दिले.
श्री श्री महावतार बाबाजी यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये क्रियायोगाचे प्रसार प्रचार करण्याचे दैवी कार्य श्री श्री परमहंस योगानंद यांच्याकडे सोपविले. श्री श्री परमहंस योगानंदजींना त्यांच्या पश्चिमेकडील पवित्र कार्याला सुरुवात करण्याआधी, दैवी आश्वासनाची गरज भासली. जसे त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिले आहे; माझे अंत:करण अमेरिकेस जाण्याकरिता तयार होते, पण दैवी अनुज्ञेचा दिलासा मिळविण्याचा निश्चय त्याहूनही अधिक दृढ होता.

25 जुलै 1920 रोजी योगानंदजींनी अगदी पहाटेपासूनच आपल्या उत्कट प्रार्थनांनी अवघा आसमंत ढवळून काढला. जेव्हा त्यांचा दैवी संपर्क कळसास पोहोचला, तेव्हा त्यांच्या कोलकाता येथील घराच्या दारावर थाप पडली. हजार सूर्यांच्या तेजासारखे तळपणारे  हिमालयातील ते सर्वव्यापी गुरू आपल्या तरुण शिष्यासमोर प्रकट झाले. दीपून गेलेल्या त्या तरुणाशी ते हिंदीत मधुरपणे म्हणाले, “होय, मी बाबाजी आहे. आपल्या स्वर्गीय पित्याने तुझी प्रार्थना ऐकली आहे. त्याने मला तुला सांगण्याचा आदेश दिला आहे: तुझ्या गुरूंच्या आज्ञेचे पालन कर आणि अमेरिकेस जा. भिऊ नकोस; तुझी सगळी काळजी घेतली जाईल.”
या प्रसंगाच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी जगभरातील क्रियायोगाचे साधक 25 जुलै हा दिवस बाबाजी स्मृती दिवस म्हणून साजरा करतात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.