नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ व परिसर) आज निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांनी अक्षरशः ढवळून काढला. धावपळ, घोषणाबाजी आणि भव्य रॅली हा प्रचाराचा ‘क्लायमॅक्स’ होता. तो शिवसेनेच्या झंझावाताने गाजला. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेल्या मतदानाच्या हक्काचा वापर करून प्रभागात परिवर्तन घडवा आणि ‘धनुष्यबाण’ या निशाणीवर शिक्का मारून आम्हाला विजयी करा, असे आवाहन यावेळी उमेदवारांनी केले.
मंगळवारी (दि. १३ जानेवारी २०२६) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार नयना (करुणा) रामवंशी (१-अ), गणेश चव्हाण (१-ब), उर्मिला निरगुडे (१-क) आणि प्रवीण जाधव (१-ड) यांनी कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह संपूर्ण परिसर पिंजून काढला. गोरक्षनगर, खंडेराव मंदिर, जयंती हॉस्पिटल, जिजामाता गार्डन, जुईनगर, अक्षर बंगला, चाणक्यपुरी आणि एकतानगर या भागांत भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मतदारांना ईव्हीएमवर मतदान कसे करावे, याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

प्रचारादरम्यान उमेदवारांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. “गेल्या २५ वर्षांपासून या प्रभागाचा विकास रखडला आहे. सत्ताधाऱ्यांना केवळ खुर्चीचा मोह आहे, जनतेच्या प्रश्नांशी त्यांना देणेघेणे नाही. प्रभागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असून गेल्या नऊ वर्षांत रस्त्यांवर डांबर पडलेले नाही. जी काही कामे झाली, ती आमदार निधीतून झाली आहेत,” असा आरोप उमेदवारांनी केला. स्वतः कामे न करता इतरांच्या कामात अडथळे आणणाऱ्यांना यंदा जनता धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रचाराची सांगता एका भव्य बाईक रॅलीने करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर निनादून गेला होता. मतदानाच्या माध्यमातून परिवर्तनाची लाट आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
—