लाहिरी महाशय : जगाला क्रियायोग देणारे योगावतार 

0
“ध्यानाद्वारे तुमच्या सर्व समस्या सोडवा. निरर्थक कल्पनारंजन सोडून प्रत्यक्ष ईश्वर संपर्क साधा.”
 — लाहिरी महाशय
कधीकधी एखादा महान आत्मा शांतपणे आपल्या मध्ये वावरतो — जगाच्या नजरेला न दिसता, पण पुढील पिढ्यांसाठी तेजस्वी मार्ग आखून जातो. असेच एक महापुरुष होते लाहिरी महाशय. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1828 रोजी बंगालमधील घुर्णी येथे झाला. परमहंस योगानंदांनी Autobiography of a Yogi मध्ये वर्णन केल्याप्रमाणे, त्यांच्या जीवनाने आध्यात्मिक साधनेविषयीच्या आपल्या आकलनात एक ऐतिहासिक टप्पा गाठला.
लाहिरी महाशय, जे योगावतार म्हणून परिचित आहेत, ते संन्यासी किंवा एकांतवासी नव्हते. ते एक गृहस्थ होते — पत्नी व मुलांसह राहणारे, आणि वाराणसीत सरकारी लेखापाल म्हणून कार्यरत असलेले. पण 1861 मध्ये, रानीखेतजवळ नियुक्त असताना, त्यांच्या जीवनाचा प्रवाह बदलला. हिमालयाच्या पायथ्याशी जगापासून दूर  राहणाऱ्या, अमर योगी महावतार बाबाजींनी त्यांना आपल्याकडे बोलावले, आणि क्रियायोग या हरवलेल्या यौगिक प्रणालीची दीक्षा दिली — जे असे साधन आहे, ज्यामुळे आत्मविकास वेगाने होतो; कारण एका क्रियेच्या साधनेने एका वर्षाच्या नैसर्गिक आध्यात्मिक प्रगती इतका लाभ होतो.
ही घटना ऐतिहासिक होती. अनेक शतकांपासून अशी साधना फक्त संन्यस्तांना दिली जात असे. पण लाहिरी महाशयांच्या विनंतीवर बाबाजींनी मान्यता दिली की ही साधना  सर्व प्रामाणिक साधकांना दिली जावी. आणि अशा रितीने लाहिरी महाशयांचे दैवी कार्य सुरू झाले — केशरी वस्त्रांतले गुरू म्हणून नव्हे, तर प्राचीन योग आणि आधुनिक जग यांना जोडणारा जिवंत सेतू म्हणून.
वाराणसीला परतल्यावर, लाहिरी महाशयांनी शांतपणे क्रियायोगाची दीक्षा देणे सुरू केले. ब्राह्मण, व्यापारी, विद्वान आणि गृहस्थ — सगळे त्यांचे शिष्य झाले. जातिभेद आणि धार्मिक बंधने मोडून त्यांनी एक साधा संदेश दिला : “देव सर्वांसाठी आहे.”
त्यांच्या अनेक शिकवणींपैकी एक वाक्य विशेष प्रसिद्ध झाले:  “बनत, बनत, बन जाए.”
“प्रयत्न, प्रयत्न… आणि एके दिवशी परमलक्ष्य साकार होते.”
आध्यात्मिक मार्गावर मंद गतीने प्रगती होत असल्याने निराश होणाऱ्यांसाठी हे त्यांचे उत्तर होते. यात त्यांचा मूलभूत संदेश दडलेला आहे — सातत्यपूर्ण व प्रामाणिक साधना नक्कीच फळ देईल.
लाहिरी महाशयांचे एक प्रमुख शिष्य होते स्वामी श्री युक्तेश्वर — अतिशय गहन प्रज्ञेचे व्यक्तिमत्त्व, जे पुढे परमहंस योगानंदजींचे गुरू झाले. लाहिरी महाशयांनी स्वतः योगानंदजींच्या जीवनप्रवाहात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. योगानंदजी अजून लहान बाळ असताना, त्यांच्या आईने त्यांना लाहिरी महाशयांकडे आशीर्वादासाठी नेले. महान योग्यांनी त्या शिशूच्या कपाळावर हात ठेवला आणि भाकीत वर्तवले :
“आई, तुझा मुलगा योगी होईल. तो एक आध्यात्मिक इंजिन बनेल, जो असंख्य आत्म्यांना ईश्वरी राज्यात नेईल.”
ते भाकीत सत्य ठरले. योगानंदजी क्रियायोग ध्यानाचे जगातले  महान प्रसारक झाले आणि त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये Self-Realization Fellowship (SRF) तसेच रांचीमध्ये योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (YSS) ची स्थापना केली. या संस्थांमार्फत योगानंदजींनी त्यांच्या दिव्य गुरूंकडून प्राप्त केलेल्या योगावतारांच्या परंपरेतल्या शिकवणींचा  आजही जगभर प्रसार केला जात आहे.
आपल्याकडे अद्भुत सिद्धी असूनही लाहिरी महाशय सदैव नम्र आणि साधेपणाने जगले. त्यांच्या शांत सेवेच्या जीवनाने दाखवून दिले की आत्मज्ञानप्राप्ती आणि सांसारिक जबाबदाऱ्या या एकमेकांच्या विरुद्ध नसून, दोन्ही एकत्रितपणे जगता येतात.
आज, 30 सप्टेंबरला लाहिरी महाशयांचा जन्मदिन साजरा करताना, आपण अशा एका सद्गुरूंना आठवतो ज्यांनी कधीही कीर्तीची अपेक्षा न ठेवता आध्यात्मिक इतिहासाचा प्रवाहच बदलून टाकला. कधी हिमालयात लपलेल्या  क्रियायोग साधनेचे आज जगभर अनुसरण होत आहे.
लाहिरी महाशयांमध्ये आपण एक अद्वितीय संगम पाहतो : मानवी रूपात संपूर्णतेने प्रकटलेले दैवी, आणि दैनंदिन जीवनातून प्रकटलेले सनातन.
लेखक : रेनू सिंह परमार
अधिक माहिती : yssofindia.org

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.