नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला व्यवस्थापकीय संस्थापिका, विश्वस्त, पालक, शिक्षक, शालेय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहणाचा मान शाळेचे विश्वस्त निवृत्त कर्नल विजयकुमार दत्ता यांना मिळाला. त्यानंतर राष्ट्रगीत, झेंडा गीत आणि भारत माता की जय व वंदे मातरमचा घोष करत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून टाकले.
विद्यार्थ्यांनी यानंतर वतन की राह मे वतन के नौजवान, सेना की जय जय हो जाये, अशी देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सिया झा व श्रेया नल्ले या विद्यार्थिनींनी आपल्या भारत देशाची यशोगाथा, स्वातंत्र्याविषयीचा दृष्टिकोन, स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान व स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व या विषयावर प्रेरणादायी भाषणे केली. स्वातंत्र्याचा संघर्ष या विषयावर रिबा शेख या विद्यार्थिनीने कविता सादर केली. त्यामुळे अनेकांची मने भारावून गेली. सम्यक काळे व अभिनव मौर्य या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.
निवृत्त कर्नल दत्ता यांनी, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिलेले बलिदान आणि सध्याच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनण्याचा संदेश दिला. आर्तिका सिंग या विद्यार्थिनीने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध रीतीने पार पडला. खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
—