कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हसरूळ व परिसरात (प्रभाग क्र. १) विकासकामांना गती द्यावी

नगरसेवक प्रविण जाधव यांच्यासह नागरिकांची मागणी

0

नाशिक  : प्रतिनिधी
नाशिक शहरात होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक – एक (म्हसरूळ व परिसर) येथील विविध विकासकामांना तातडीने गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे नगरसेवक प्रविण जाधव यांच्यासह नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सिंहस्थ काळात लाखो भाविक नाशिक शहरात दाखल होणार असल्याने पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच पौराणिक स्थळांचा विकास अत्यंत आवश्यक ठरत आहे. विशेषतः म्हसरूळ परिसरातील सीता सरोवरला धार्मिक व पौराणिक महत्त्व आहे. रामायण काळात माता सीता यांनी वनवासात येथे वास्तव्य केल्याची आख्यायिका प्रचलित असून, सिंहस्थ काळात येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्यीकरण, मूलभूत सुविधा आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय म्हसरूळ–वरवंडी हा रस्ता एअरपोर्टला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग असून, सध्या त्याची रुंदी केवळ सुमारे ३.५ मीटर आहे. वाढत्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर अडचणी निर्माण होत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील मार्ग बंद झाल्यास हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो. त्यामुळे सदर रस्त्याचे पूर्ण रुंदीकरण व मजबुतीकरण तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, किशोर सूर्यवंशी मार्ग हा प्रस्तावित तसेच अस्तित्वातील आउटर रिंग रोडला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मागील कुंभमेळ्यादरम्यान शहरातील वाहतूक या मार्गावरून वळविण्यात आली होती. भविष्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण येण्याची शक्यता असल्याने या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, संपूर्ण रुंदीकरण, ड्रेनेज व्यवस्था, पथदिवे आणि पदपथ यांसह सर्वांगीण विकास करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, नगरसेवक प्रविण जाधव यांच्यासह सर्व म्हसरूळचे ग्रामस्थ उपस्थित होते.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हसरूळ येथील प्राचीन सीता सरोवराचा विकास व्हावा, तसेच म्हसरूळ – वरंवडी रोडचे रुंदीकरण व्हावे, यासाठी म्हसरूळ ग्रामस्थांसह मनपा आयुक्त मनिषा खत्री यांची भेट घेतली. या संदर्भात चर्चा केली असता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यापुढेही प्रभागातील विकासकामांसाठी त्यांचे सहकार्य होईल.
– प्रविण जाधव, नगरसेवक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.