नाशिक : प्रतिनिधी
येथील ओडिसी नृत्यांगणा मानसी देवेंद्र अहिरे हिचा रंगमंच प्रवेशाचा कार्यक्रम आज (बुधवार, दि. २ जुलै) महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये सायंकाळी सहा वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ओडिसी नृत्याच्या ज्येष्ठ्य गुरू झेलम परांजपे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, स्पेक्ट्रमचे संचालक कपिल जैन उपस्थित असतील. मानसी ही नृत्यसाधना कला अकॅडमीच्या गुरू डाॅ. संगीता पेठकर यांची शिष्या आहे.
गुरूकडे शास्त्रीय नृत्याचे सुमारे सात ते दहा वर्षांहून अधिक काळ शिक्षण घेतल्यानंतर या रंगमंच प्रवेश कार्यक्रमाद्वारे विद्यार्थीनीला रंगमंचावर स्वतंत्रपणे नृत्य सादर करता येते. एक प्रकारे हा कार्यक्रम म्हणजे, नृत्याचे शिक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आहे. अर्थात नृत्यविषयक साधना आयुष्यभर सुरू असते.
मानसी हिचे शालेय शिक्षण नाशिकमधील विज्डम हाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. नंतर तिने प्रतिष्ठित आयआयटी मुंबई येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. मानसी वयाच्या पाचव्या वर्षांपासून नृत्यविषयक शिक्षण घेत आहे. ती गुरू डाॅ. संगीता पेठकर यांच्याकडे ओडीसी नृत्याचे सुमारे १५ वर्षांपासून शिक्षण घेत आहे. तिला या नृत्यविषयक प्रवासात वडिल देवेंद्र अहिरे व आई सुवर्णा अहिरे यांचे पाठबळ लाभत आहे. तिने पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ओडिसी नृत्याचा डिप्लोमाही पूर्ण केला आहे. मानसी हिने आतापर्यंत अनेक सामुहिक ओडिसी नृत्य कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे.
—