नाशिक : प्रतिनिधी
योग म्हणजे स्वाध्याय करणे, स्वतःचा अध्याय वाचणे, हे प्रभू श्रीराम यांनी आपल्याला शिकवले. त्यांनी सतत स्वतःचा अभ्यास केला. साहजिकच त्यांच्यात दोषांना स्थान राहिले नाही. त्यांची वर्तणूक कायमच माणसाने कसे चांगले वागावे, हे सांगणारी आहे. या प्रक्रीयेतून त्यांनी प्रत्येक नात्याचा आदर्श निर्माण केला. तसेच योगाचा महत्त्वपूर्ण सिध्दांत म्हणजे, भावना व कर्तव्य यांच्यात संघर्ष झाला, तेव्हा त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. प्रभू श्रीरामाचे संपूर्ण जीवन असे योगमय होते. यातूनच ते आदर्श मर्यादापुरुषोत्तम झाले. त्यामुळे त्यांचे जीवन शीतल, आल्हाददायक आहे. हे श्रीराम चरित्र घराघरात पोहचल्यास संपूर्ण मानवता सुखी होईल, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व योगशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. राज सिन्नरकर यांनी केले.

योग व श्रीराम जीवन
पंचवटीतील प्राचीन श्री काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सवात योग व श्रीराम जीवन या विषयावर व्याख्यानप्रसंगी ते शनिवारी (दि.9) बोलत होते. याप्रसंगी प्रा.सिन्नरकर यांनी रामायणातील विविध सौंदर्य स्थळे उलगडून दाखवली. त्यातून योगमय जीवन कसे असते व ते आपल्याला काय संदेश देते, हे समजावून सांगितले. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते. ते या रामकथेने मंत्रमुग्ध झाले होते. श्री.नरेश पुजारी यांनी सूत्रसंचालन केले.
प्रत्येक चरित्रातून योग
प्रा. सिन्नरकर म्हणाले की, माणसाची वर्तणूक हा मानवतेपुढचा प्रश्न आहे. माणसाचा माणसाशी संबंध कसा चांगला असला पाहिजे हे महर्षी वाल्मिकी यांनी
रामायणातून उलगडून दाखवले आहे. रामायणातील अनेक प्रसंग आपल्याला योगाचे दर्शन घडवतात. त्यातील प्रत्येक चरित्राने योग शिकविला आहे.
स्वतःचे जीवन तपासावे
प्रा.सिन्नरकर म्हणाले की, योग म्हणजे फक्त आसन व प्राणायम नाही. योग म्हणजे स्वतःचे जीवन तपासणे. आपण प्रत्येक क्षणी भगवंताशी जोडलेले असणे, म्हणजे योग होय. आत्म्याला परमात्म्याशी जोडणे याला योग म्हणतात. आपल्याला शरीराची व्यवस्था सांभाळणारी शक्ती म्हणजे आत्मा व आपल्या विश्वाची व्यवस्था सांभाळणारी शक्ती म्हणजे परमात्मा होय. बाहेर सतत विषयांच्या मागे धावणाऱ्या मनाला आत वळविणे व आत्म्याशी जोडणे, म्हणजे योगच आहे. माणूस माणसाची जोडणे व ही सर्व माणसे ईश्वराशी जोडणे म्हणजेही योग होय, असे स्वाध्याय कार्याचे प्रणेते व माझे अध्यात्मिक गुरू पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी म्हणतात, असे त्यांनी सांगितले. हे सर्व आपल्याला राम चरित्रातून दिसते.
संस्कृतीचे दोन पंख
आपल्या संस्कृतीचे दोन पंख आहेत पहिला म्हणजे यज्ञ संस्कृती व दुसरा मूर्तिपूजा आहे. मूर्तीपूजनाने चित्ताची एकाग्रता साधली जाते. त्याने चित्ताला शांतता, सामर्थ्य मिळते व यज्ञाने मानवतेचा विकास होतो. यज्ञ आणि मूर्तिपूजा यांना जोडण्याचे कार्य प्रभु श्रीराम यांनी केले. त्यांनी योग जुळवून आणला, असेही सिन्नरकर यांनी सांगितले.
प्रा. सिन्नरकर म्हणाले की, प्रभू श्रीराम आपल्याला म्हणतात, तू तुझ्या आतमध्ये डोकव, मी तुझ्या आतमध्येच आहे. मी तुला मदत करेन. तू तुझे दोष बाहेर काढ, मग तुझे जीवन सुंदर बनेल. मात्र, लोकांना प्रभ् श्रीराम मान्य आहे, पण श्रीराम यांनी दाखविलेला मार्ग मान्य नाही, ही शोकांतिका आहे. त्यांनी सांगितलेला योग आपण अंगिकारला पाहिजे. आतला राम आपल्यात आहे, तोपर्यंतच आपल्याला किंमत आहे, हे लक्षात घ्यावे. म्हणूनच श्रीरामा आपण जे क्रांतिकारक विचार मांडले, ते आमच्या जीवनात येऊ द्या, अशी प्रार्थना व कृती करावी, असेही प्रा. सिन्नरकर यांनी सांगितले.
—
