नाशिक : प्रतिनिधी
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक संचालित, लोकमान्य विद्यालय, गाडगे महाराज मठ या विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव घोडके यांच्या सेवापूर्ती सोहळा संस्थेच्या दिंडोरी रोडवरील आठवले-जोशी बाल विकास मंदिर या शाळेत झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जयंत कुलकर्णी होते.
संस्थेचे उपाध्यक्ष उदय शेवतेकर म्हणाले की,
महाराष्ट्रातील अनेक शाळा या मुख्याध्यापकांच्या नावाने त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ओळखल्या जातात. भारतीय शिक्षणात गुरूला अनन्यसाधारण महत्व प्राप्त असून प्रत्येक शिक्षकाने चारित्र्यसंपन्न, वक्तशीरपणा, निरंतर साधना, वाचन – व्यासंग या गुणांची जोपासना करावी. समाजाला बदलण्याचे सामर्थ्य प्रत्येक शिक्षकांत असते. आपल्यातील दोष कमी करण्याचे प्रांजळ प्रयत्न करावेत व पालकांचा विश्वास संपादन करावा.
सत्कारमूर्ती घोडके यांनी याप्रसंगी संस्था, शाळा, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आपला शैक्षणिक प्रवास उलगडला. संस्थेचे कार्यवाह अनिल कुरविनकोप यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात संस्थेचे सहकार्यवाह सुधीर पाटील यांनी संस्थेशी ऋणानुबंध कायम ठेवत संस्थेला सहकार्य करावे, अशी इच्छा व्यक्त केली. लीना पुराणिक यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे घोडके यांचा जीवनवृत्तांत सादर केला. सोहळाप्रमुख श्रीराम महाजन यांनी घोडके यांच्या कार्याचा गौरव करत अनुभवकथन केले.
याप्रसंगी सुनंदा पाटील, भारती ठाकरे, दर्शना मोरे, अश्विनी कुलकर्णी, दीपक गोविंद यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कन्या स्नेहल घोडके हिने मनोगतात वडिलांची शिस्तप्रियता, वक्तशीरपणा समाजकार्य व्यक्त केले. सन्मानपत्राचे वाचन सीमा कुलकर्णी यांनी केले.
शशांक ईखणकर यांनी गीताचे सादरीकरण केले. जयंत कुलकर्णी यांनी घोडके यांना वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोहळ्यानिमित्त ख्यातनाम सायकलिस्ट उल्हास कुलकर्णी उपस्थित होते. राजेंद्र बिऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. फेसबूक लाईव्हची जबाबदारी अर्पिता घारपुरे यांनी निभावली. सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, घोडके कुटुंबीय, मुख्याध्यापक, शिक्षक, हितचिंतक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
—
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मुख्याध्यापक महादेव घोडके यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
Get real time updates directly on you device, subscribe now.