नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संस्थापिका आणि मार्गदर्शिका सुमन दत्ता यांच्या वाढदिवसानिमित्त एक सप्टेंबरला शाळेमध्ये विविध सेवाभावी, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, सेवाभाव, कृतज्ञता आणि संस्कारशीलता या जीवनमूल्यांचे संवर्धन करणे हा होता. शालेय जीवनातच मूल्यशिक्षणाची बीजे पेरली गेल्यास पुढील पिढी जबाबदार नागरिक म्हणून घडू शकते, या विचारातून या उपक्रमांची आखणी करण्यात आली होती.
या विशेष दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. ज्यामध्ये १५० रोपे लावण्यात आली. त्याशिवाय वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे तो संपूर्ण स्वयंपाक शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी अत्यंत प्रेमाने केला होता. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, तसेच त्या शाळेतील ग्रंथालयासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे दान यासारख्या उपक्रमांनी सामाजिक जाणिवेला बळकटी देणारे संदेश दिले. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सेवा, दया, दातृत्व वृत्ती आणि सामाजिक उत्तरदायित्व यांसारखी जीवनमूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचा सांस्कृतिक विभाग विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांनी संस्थापिका सुमन दत्ता यांच्या कार्याचा आढावा घेणारी गीतं, कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे, आणि त्यांना समर्पित रॅम्प वॉक सादर करून त्यांच्याविषयीचा स्नेह आणि आदर व्यक्त केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शाळेने मिळवलेली शैक्षणिक प्रगती विद्यार्थ्यांच्या अभिनय, नृत्य आणि गीतांमधून प्रकट झाली.
कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडले. विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संपूर्ण शाळा कुटुंबाची एकजूट यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला.
—