नाशिक : प्रतिनिधी
म्हसरूळमध्ये (प्रभाग क्रमांक एक) नागरी सुविधा पुरेश्या नाहीत. त्यामुळे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला अडथळा ठरत आहे. त्यावर पक्की उपाययोजना म्हणजे शिवसेनेचे चार उमेदवारांचे पॅनल निवडून आणणे गरजेचे आहे. यातील तीन उमेदवार इंजिनिअर, तर एक उमेदवार शिक्षका आहे. त्यांना प्राधान्य दिले तर ते नक्कीच काही नवीन घडवतील, अशा प्रतिक्रीया नागरिक देत आहेत. निमित्त आहे, नाशिक महापालिका पंचवार्षिक निवडणुकीचे. शिवसैनिक प्रभागात गुरूवारी (दि.८) प्रचारासाठी फिरत असताना, त्यांना या प्रतिक्रीया मिळत होत्या.
विकासासाठी ‘इंजिनिअर’ आणि ‘शिक्षक’ पॅनलची चर्चा
प्रभाग १ मधून शिवसेनेने नयना (करुणा) रामवंशी, गणेश चव्हाण, उर्मिला निरगुडे आणि प्रवीण जाधव या चौघांना रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे, यातील प्रवीण जाधव, गणेश चव्हाण आणि नयना रामवंशी हे तिघे इंजिनिअर आहेत, तर उर्मिला निरगुडे या शिक्षिका आहेत. सुशिक्षित आणि तांत्रिक ज्ञान असलेले उमेदवार निवडून आल्यास प्रभागाच्या विकासाला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे.
शिवसेना कार्यकर्ते व मतदारांनी सांगितले की, येथील आधीच्या नगरसेवकांकडे महत्त्वाची पदे होती. पण, प्रभागात समस्या कायम आहेत. पाणी पुरवठ्याची समस्या आहे. गार्डन ओस पडली आहेत. जस जशी निवडणूक जवळ आली, तसे त्यांनी खड्ड्यांकडे लक्ष दिले. पण, त्याच्या अगोदर अशी परिस्थिती होती की, लोक अक्षरश: वैतागलेले होते. पण, महत्त्वपूर्ण पदे असताना कामे परिणामकारक झाली नाहीत. आता आम्ही प्रभागात फिरत असताना लोकांचे म्हणणे आहे की, आम्ही कामे घेऊन त्यांच्याकडे गेलो असता दखल घेण्यात आली नाही.
युवकांसाठी हवीत क्रीडा संकुले
प्रभागात केवळ रस्ते-पाणीच नव्हे, तर तरुणांसाठी जलतरण तलाव आणि जिम्नॅस्टिक सुविधांची गरज नागरिकांनी बोलून दाखवली. अशा सुविधा मिळाल्यास स्थानिक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर प्रभागाचे नाव उंचावू शकतात, अशी भावना व्यक्त होत आहे. सुशिक्षित उमेदवारांचे हे पॅनल म्हसरूळचा चेहरामोहरा बदलेल, अशी खात्री आता नागरिकांना वाटू लागली आहे.
—