नाशिक : प्रतिनिधी
राजीवनगर येथील टागोर कल्चरल ॲण्ड सोशल असोसिएशन आयोजित दुर्गा पूजा महोत्सवात नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे नृत्याविष्कार करण्यात आला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
लता मंगेशकर यांच्या गीतांवरील नृत्यास पसंती
भरतनाट्यम नृत्यास गणेश वंदनेनी सुरुवात करण्यात आली. नंतर जुन्या शास्त्रीय गीतांवर कृष्ण, राधा असे नृत्य सादरीकरण करण्यात आले. याला प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. गानसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी गायलेल्या गीतांवर केलेल्या भरतनाट्यम नृत्यास प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली. याप्रसंगी भरतनाट्यम नृत्यांगणा व गुरू सोनाली करंदीकर यांनी आपल्या शिष्या ऐश्वर्या अफझलपूरकर, खुशी रोजेकर, समृध्दी जाधव, रिया खालकर, पूर्वा भानोसे, तनिषा पोरजे, पलक राठी यांच्यासोबत नृत्य सादर केले.
आरती बंगाली पद्धतीने
समारोपाला परब्रह्मरूपिणी हे महालक्ष्मीचे गीत, त्यानंतर जय जय, जगत जननी आणि जय दुर्गे दुर्गती परिहरिनी हे पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या गीतावर नृत्यप्रकार केला. टागोर असोसिएशनचे मृदुल देब यांनी सोनाली करंदीकर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाआधी दूर्गा मातेची आरती बंगाली पद्धतीने करण्यात आली. या आरतीचा मान सोनाली करंदीकर यांना मिळाला.
बारा वर्षांपासून नृत्य सादरीकरण
नृत्याली अकॅडमीतर्फे गेल्या 12 वर्षांपासून दरवर्षी नृत्य सादरीकरण करण्यात आले. यात प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर नृत्य सादर केले. ही आमच्या सर्वांसाठी आनंदायक बाब आहे.
– सोनाली करंदीकर, भरतनाट्यम नृत्यांगणा
—