नाशिक : प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा हा परम मांगलिक सोहळा आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजात धर्म, भक्ती, निती, वैराग्य, विवेक आणि ज्ञान यांची पेरणी केली. समाजपयोगी, समाजहिताच्या गोष्टी संतांनी केल्या आहेत. संतांचे जीवन दीपस्तंभाप्रमाने असल्याचे विचार श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले.

अमृतधाम येथे सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी डॉ. गुट्टे बोलत होते. कोरोना नियमांचे पालन करत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास महाराज, भाजपाच्या राज्य वैद्यकिय आघाडीच्या पदाधिकारी डॉ. मंजुषा दराडे, मनपा अधिकारी जितेंद्र पाटोळे, मिशनचे शहर प्रमुख दिलीप अहिरे, जिल्हाध्यक्ष विजय सोनवणे, सोमनाथ बोडके, श्याम पिंपरकर आदी उपस्थित होते.
डॉ. गुट्टे म्हणाले की, ज्ञानेशो भगवान विष्णू : संत ज्ञानेश्वरांनी स्वेच्छेने अवतार धारण केला होता. श्री विठ्ठलाच्या साक्षीने, गुरु आज्ञेने संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. संत नामदेव महाराज यांनी समाधी सोहळ्याचे अभुतपूर्व वर्णन केले आहे. ब्रह्म स्थितीरूप समाधीची अत्त्युच्च कोटीची आदर्श स्वरूपाची अभिव्यक्ती म्हणजे संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. समाधी सोहळ्याच्या वर्णनप्रसंगी भाविकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
कार्यक्रमापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पूजन महंत भक्तिचरणदास महाराज यांच्या हस्ते झाले. यानंतर परिसरातून पालखी मिरवणुक काढण्यात आली. महिलांनी ठिकठिकाणी पालखीचे पूजन केले. कार्यक्रमास दिलिप अहिरे, संजिव अहिरे, ए. पी. पाटील, शांताराम जाधव, भाऊसाहेब निकम, रामदास श्रीशेठ, दत्तात्रय आंबेकर, बाळकृष्ण नागरे, उमेश तोतरे, चंद्रकांत भामरे, एम. एन. अकोटकर, अनिल सांगळे, ओमकार आहेर यांच्यासह साईनगर हरिपाठ महिला भजनी मंडळ, परिसरातील वारकरी बांधव उपस्थित होते.
—