नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजताच पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ) मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, विरोधकांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. जनसामान्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ‘बदलाच्या’ निर्धाराने प्रस्थापित उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांचीच चर्चा केंद्रस्थानी
शिवसेना (शिंदे) पक्षाने या प्रभागात नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ड) यांसारख्या सुशिक्षित आणि स्थानिक चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे. या उमेदवारांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे प्रत्येक चौकात आणि बैठकीत त्यांचीच चर्चा केंद्रस्थानी आहे.

प्रभाग ‘धनुष्यबाणा’च्या घोषणांनी दुमदुमला
प्रभागात शुक्रवारी (दि. ९) काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. रॅलीच्या प्रारंभीच कार्यकर्त्यांनी “खिच के ताण… धनुष्यबाण” अशा गगनभेदी घोषणा देत प्रचाराचा धुराळा उडवून दिला. ही रॅली पोकार कॉलनी, विजयनगर, शिवगणगेश्वर नगर, रामेश्वरनगर, मोराडे वस्ती आणि जगन्नाथ लॉन्स परिसरातून उत्साहात मार्गस्थ झाली. या रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात भगवेमय वातावरण निर्माण झाले असून मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विकासाची ही नवी लाट प्रभाग १ मध्ये
“आता पुरे झाले तेच तेच चेहरे! आम्हाला बदल हवा आहे,” असा सूर प्रभागातून उमटत आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार सुशिक्षित असून त्यांना स्थानिक प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे यावेळी प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखवून नवीन लोकप्रतिनिधींना संधी देण्याची चर्चा आहे. विकासाची ही नवी लाट प्रभाग १ मध्ये मोठे परिवर्तन घडवेल, असा विश्वास राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
—