नाशिक : प्रतिनिधी
कौशल्य विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत टीमलीज फाउंडेशन आणि ए. बी. बी. कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वायरमन कंट्रोल पॅनल या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचा यशस्वी समारोप झाला. गंगापूररोड परिसरातील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षणप्रसारक संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये २६ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात आयटीआयमधील विविध व्यवसायातील तब्बल ८७ प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या तांत्रिक कौशल्यांची उजळणी केली. विशेष म्हणजे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी वायरमन कंट्रोल पॅनल या विषयात उत्कृष्ट श्रेणी मिळवून आपले यश अधोरेखित केले.
या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी क्रांतिवीर व्ही. एन. नाईक आयटीआयमध्ये मंगळवारी (दि. १७ मार्च २०२६) प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात आयटीआयचे प्राचार्य नितीन काळे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते.
यावेळी आयटीआयचे गटनिदेशक साहेबराव हेंबाडे आणि उमेश पालवे, तसेच निदेशक दीपक साळवे, आनंद जाधव, मधुकर वाघेरे, मधुकर सानप, गोकुळ बेदाडे, मोहन पवार आदी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांना नव्या संधीचे क्षितिज खुले झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. हा प्रशिक्षण उपक्रम केवळ तांत्रिक ज्ञानापुरता मर्यादित न राहता प्रशिक्षणार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी झेप देणारा ठरला आहे.
—
वायरमन कंट्रोल पॅनल या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
Get real time updates directly on you device, subscribe now.
Prev Post