नाशिक : प्रतिनिधी
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या अनुषंगानेच म्हसरूळ व परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग एकमध्ये येत्या काही महिन्यांतच विविध नागरी सुविधा अधिक दर्जेदार होणार आहेत. तसेच या प्रभागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन येथील चारही नवनिर्वाचित नगरसेवकांनी दिले.
येथील स्वामी विवेकानंद नगरच्यावतीने प्रभाग क्रमांक एकमधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ नुकताच झाला. छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, स्वामी विवेकानंद नगर येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी नगरसेविका दिपाली गीते, नगरसेविका रंजना भानसी, नगरसेविका रुपाली नन्नावरे व नगरसेवक प्रविण जाधव यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते व भाजप पंचवटी मंडळाचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंदनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष सुभाष काकड होते.
याप्रसंगी सर्व नगरसेवकांनी मनोगत व्यक्त केले. गणेश गिते म्हणाले की, पेठरोडच्या उर्वरित रस्त्याचे सिमेंटीकरण, जलशुद्धीकरण यंत्रणा, चौकाचौकांत सीसीटीव्ही कॅमेरे, आडगाव लिंकरोवरील कामे यासह अनेक कामांना सिंहस्थात चालना मिळेल. तसेच केंद्र सरकारकडूनही निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सुभाष काकड म्हणाले की, परिसरात विकास होत आहे. उर्वरित समस्याही नगरसेवक लवकरच दूर करतील, अशी खात्री आहे.
याप्रसंगी सर्व नगरसेवकांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष काकड यांच्यासह निवृत्त पोलिस अधिकारी प्रभाकर रायते, प्रकाश धात्रक, तानाजी सूर्यवंशी, स्वानंद कुलकर्णी, योगेश पाबळे, प्रशांत जोशी, कृष्णा दुसाने, सुनील शिंदे व राजेंद्र वाघमारे आदींनी नगरसेवकांचा सत्कार केला. मिलिंद देवकुटे यांनी सूत्रसंचालन केले.
तुषार वानखेडकर, दिगंबर धांडे, मंगेश विसपुते, वसंत कुलकर्णी, राजेंद्र वाघमारे, विष्णू झिरवाळ, सचिन सुकेणकर, दिलीप खुर्दळ आदी कार्यक्रमासाठी प्रयत्नशील होते.
—