नाशिक : प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित पेठे विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमासाठी शालेय पदाधिकारी मुख्याध्यापक भास्कर कर्डिले, उपमुख्याध्यापक शरद शेळके, पर्यवेक्षक विजय मापारी, संस्था सहकार्यवाह शैलेश पाटोळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व सरस्वतीचे पूजन करण्यात आले.
शिवउत्सवावर आधारित शाळेत विविध कार्यक्रम झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेचे एनसीसी ऑफिसर भरत भलकार यांनी, छत्रपती शिवाजी महाराज व शाहिस्तेखान यांचा प्रसंग व्याख्यानातून प्रसंगानुरूप सांगितला. शिवाय कवी भूषणाचा प्रसंग विस्तृत पद्धतीने सांगून छज्त्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगाचे वर्णन आपल्या अमोघ आणि भारदस्त आवाजात केले. श्लोकांच्या माध्यमातून ऐतिहासिक कविता प्रसंग सादर करत असताना संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर चित्रीत करण्याची कसब आपल्या भाषणातून त्यांनी सादर केली.
कलाशिक्षिका रूपाली रोटवदकर यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गीत खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राई राई एवढ्या हे सादर केले. शाळेमध्ये ५ वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांनी सुराज्य स्थापन व्हावे ही श्रींची इच्छा! हे पथनाट्य सादर केले.
त्याचप्रमाणे समूहगीत स्पर्धा व रॅलीचे काढण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी बाळ शिवाजीचा पाळणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणारी गीते गायली. काही विद्यार्थ्यांनी शिवपारंपारिक खेळाची प्रात्यक्षिके दाखवली. उपमुख्याध्यापक शरद शेळके यांनी गड किल्ल्यांची माहिती सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांची पाण्याविषयीची दूरदृष्टीचे महत्व विशद करताना छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी यावर आधारित इतिहासकालीन दुवे यांच्याशी साधर्म्य साधून विचार मांडले.
मुख्याध्यापक भास्कर कर्डिले यांनी शिवजयंतीनिमित्त उपस्थितीत गुरुजींना शुभेच्छा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गौरवोद्धार व्यक्त केले व शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास गीत गौरी सराफ, शर्मिला खानेवाले, दीप्ती शिरसाठ, नंदन मॅडम, सोनाली चिंचोले, चंदु थुल, महेंद्र गावित, मनीष जोगळेकर, अमोल सोनवणे, अमोल जोशी, विकास खंबाइत, भाऊसाहेब नेहरे यांचे सहकार्य लाभले. पूनम वाल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक विजय मापारी यांनी आभार मानले. कार्यक्रमास शाळेतील गुरुजन व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
—