प्राचीन काळात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या व्यक्तीस शिक्षक किंवा गुरु म्हणून संबोधले जाई. हा गुरु किंवा शिक्षक मुलाला विविध विषयांचे ज्ञान आणि जीवन जगण्यासाठीचे मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत असे. शिक्षणाच्या औपचारिक आणि अनौपचारिक प्रकारांमध्ये देखील शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण आणि पथ दर्शकाची होती. प्राचीन काळात प्रामुख्याने मुलावर संस्कार रुजवण्याची व त्याच्या व्यक्तिमत्व घडविण्याची जबाबदारी ही शिक्षकाची मानली जाई म्हणूनच आई-वडिलांप्रमाणे शिक्षकाचा आदर सन्मान केला जाई.
– डॉ. आशा भीमराव ठोके
प्रभारी प्राचार्य, अशोक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
गुरुकुलांमध्ये शिष्याला निवासी राहून गुरूंकडून ज्ञान आणि संस्कार प्राप्त करावे लागत असे. गुरुची भूमिका त्यावेळी फक्त मार्गदर्शकाची नसे, तर पालकांची जबाबदारी त्याला पार पाडावी लागत असे. पालकांप्रमाणेच त्याचे पालनपोषण आणि काळजी देखील घ्यावी लागत असे. त्या काळात ज्ञानाचे मुख्य स्रोत म्हणजे केवळ गुरु किंवा शिक्षक असे. याच्याविरुद्ध आजच्या आधुनिक काळाचा संदर्भ लक्षात घेता ज्ञानाच्या स्रोतात अजूनही काही माध्यमांची भर पडली असली तरी शिक्षकाची जागा कुणीही घेऊ शकत नाही, हे तितकेच खरे आहे.
– डॉ. आशा भीमराव ठोके काळ कितीही बदलला किंवा आधुनिक झाला, तरी योग्य आणि अयोग्य काय, खरे आणि आभासी काय, चांगले आणि वाईट काय, सद्गुण आणि दुर्गुण काय, हिताचे आणि अहिताचे काय याबद्दलचे मार्गदर्शन आणि सल्ला कोणतेही आधुनिक किंवा कृत्रिम तंत्रज्ञान देऊ शकत नाही. त्यासाठी शिक्षकच लागणार आहे. आधुनिक काळात शिक्षकाने बदलत्या परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे. प्राचीन आणि आधुनिक काळातल्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे तसा होणे हे अपेक्षितच आहे, कारण शिक्षण हे नेहमी गतिमान असायला हवं.
प्राचीन आणि आधुनिक काळातल्या शिक्षण पद्धतीचा केंद्रबिंदू मध्ये परिवर्तन झालेले आहे. पूर्वीच्या शिक्षक केंद्रित शिक्षणाकडून आता विद्यार्थीकेंद्रीत शिक्षणाकडे पद्धती बदलली आहे.
आधुनिक काळात वैश्विकीकरण, तंत्रज्ञानातील प्रगती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर, शिक्षणात सर्वसामावेशकता, शाश्वत विकास, पर्यावरणवादी दृष्टीकोण, संप्रेषण आणि सामाजिक समूह माध्यमांचा वाढता वापर, मानसिक आरोग्य, कौशल्याधारित शिक्षण, क्षमता आधारित शिक्षण, एकात्मिक शिक्षण, समग्र शिक्षण, व्यवहारभिमुख शिक्षण, सामाजिक आणि भावनिक शिक्षण,ऑनलाईन शिक्षण, मुक्त आणि दूर शिक्षण इत्यादी असे अनेक नवप्रवाह शिक्षणात समाविष्ट झालेले आहे. म्हणूनच शिक्षकांनी देखील आपल्या भूमिका बदलल्या आहेत, हे स्वीकारून त्याप्रमाणे परिवर्तन करणे अपेक्षित आहे.
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसमोर अनेक व्यावसायिक पर्याय खुले असताना त्याला कोणता व्यवसाय निवडावा यासाठी योग्य ते सुचवणारा व्यावसायिक सल्लागार, अभ्यासात येणाऱ्या अडचणी किंवा समस्या कशा सोडवाव्या यासाठी योग्य तो सल्ला देणारा शैक्षणिक सल्लागार होणे अपेक्षित आहे. संशोधनाच्या या युगात विद्यार्थ्याना प्रेरणा देऊन मार्गदर्शन करून जुन्या ज्ञानावर आधारित नवीन ज्ञान निर्मिती व समस्यांवर नवीन पर्याय शोधण्यासाठी कल्पनांचा अविष्कार घडवून आणणारा नवोन्मेषक शिक्षक होणे अपेक्षित आहे.
वर्गात सर्व प्रकारच्या विविध क्षमता किंवा अक्षमता असण्याऱ्या विद्यार्थ्याना त्यांच्या गरजेप्रमाणे शिक्षण उपलब्ध आणि सुलभ करून देणारा सर्वसमावेशक वृत्तीचा शिक्षक बनणे अपेक्षित आहे.
विद्यार्थ्याना केवळ तात्विक माहिती प्रदान करण्यापेक्षा त्या ज्ञानाचा वापर व्यावहारिक जीवनात कसा होईल किंवा त्यांचा सबंध जोडणारा व्यवहार्यवादी शिक्षक होणे अपेक्षित आहे. जीवन जगताना किंवा नोकरी व्यवसाय मिळवताना ज्या कौशल्यांची आवश्यकता आहे, त्यांना विकसित करणारा व तशी वृत्ती घडविणारा कौशल्याधिष्टित शिक्षक होणे गरजेचे आहे. जे ज्ञान मिळवलेले आहे तेच विद्यार्थ्याना पुरेसे आहे, यावर समाधानी न राहता अजून ज्ञान कसे प्राप्त करता येईल. कोणत्या संसाधनांचा माध्यमांचा वापर करता येईल किंवा वेगवेगळे प्रयोग करून नवीन ज्ञान निर्मिती करता येईल का अशी जिज्ञासा वृत्ती धारण करणारा प्रयोगशील शिक्षक होणे आवश्यक आहे.
कृत्रिम बुद्धिमतेच्या या युगात जास्तीतजास्त तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, हे शिकून विधायक ज्ञान निर्मिती किंवा सुलभ ज्ञान निर्मिती, नवीन ज्ञान प्राप्तीसाठी आतुर असलेला तंत्रज्ञानाधिष्टीत शिक्षक होणे गरजेचे आहे. आजच्या काळातील समूह संप्रेषण माध्यमांच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुषपरिणामांमुळे, ताण – तणाव यामुळे बिघडलेल्या मानसिक आरोग्याचे संवर्धन करावे यासाठी मार्गदर्शन करणारा समुपदेशक बनणे काळाची गरज आहे.
अशा प्रकारच्या गतिमान काळात आणि शिक्षण व्यवस्थेत आपले स्थान अजून मजबूत करावयाचे असेल आणि विद्यार्थंच्या आयुष्यावर प्रभाव टिकवून ठेवायचा असेल, तर शिक्षकाला स्वतःला ज्ञानाने, कौशल्याने, व्यक्तिमत्वाने अद्ययावत राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठीच बदलत्या काळातील आपल्या भूमिका देखील बदलणे आवश्यक आहे यावर लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.
– –
—