नाशिक : प्रतिनिधी
मानवी जीवनातील सुख-दुःख, संघर्ष, प्रेम, वेदना, आशा आणि सामाजिक वास्तव यांचे शब्दरूप म्हणजे कविता. माणसाला संवेदनशील, विचारशील आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कविता करते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्यावतीने आयोजित केलेल्या कवितेच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
बागवे यांनी कवितेतील आशय आणि अभिव्यक्ती यातील नाते अत्यंत सखोलपणे उलगडून दाखवले. कविता केवळ सुंदर शब्दांची मांडणी नसून ती कवीच्या अनुभवांची, जाणीवांची आणि संवेदनशीलतेची प्रामाणिक अभिव्यक्ती असते, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आशय हा कवितेचा आत्मा आहे. विचार, अनुभव किंवा वेदना यांचा ठोस आशय नसल्यास कविता वरवरची ठरते. मात्र आशय जितका महत्त्वाचा आहे, तितकीच त्याची अभिव्यक्तीही जबाबदार असावी लागते. योग्य शब्दांची निवड, प्रतिमांचा वापर, भाषेतील नेमकेपणा आणि अनावश्यक शब्दांचा टाळाटाळ या घटकांमुळे कविता अधिक प्रभावी होते, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
अभिव्यक्तीबाबत बोलताना अशोक बागवे यांनी सांगितले की, कविता थेट सांगण्यापेक्षा सूचकतेतून अधिक बोलकी होते. जे स्पष्ट सांगितले जाते ते पटकन विसरले जाते, पण जे सूचित केले जाते ते वाचकाच्या मनात रेंगाळते. त्यामुळे कवितेत उपदेश टाळून अनुभव मांडणे आवश्यक आहे. कविता वाचकाला विचार करायला लावते, तेव्हाच ती यशस्वी ठरते. आशय आणि अभिव्यक्ती यांचा समतोल साधता आला, तरच कविता प्रामाणिक आणि टिकाऊ ठरते. कवीने स्वतःच्या अनुभवांशी प्रामाणिक राहून, भाषेवर संयम ठेवत लिहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी नवोदित कवींना दिला.
कवी सतीश सोळांकूरकर यांनी मुक्तछंदातील कविता आणि छंदोबद्ध कविता यांतील फरक, वैशिष्ट्ये आणि परस्पर नाते अत्यंत स्पष्टपणे उलगडून दाखवले. कविता कोणत्या छंदात लिहिली जाते यापेक्षा ती किती प्रामाणिक आहे, हे अधिक महत्त्वाचे असते; मात्र त्या प्रामाणिकतेला योग्य रचना आणि शिस्त लाभली, तर कविता अधिक प्रभावी ठरते, असे त्यांनी प्रतिपादन केले.
छंदोबद्ध कवितेबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, वृत्त, मात्रा, यमक आणि लय यांचे भान राखून लिहिली जाणारी कविता ही शिस्तीची साधना आहे. छंद कवीला मर्यादा घालून देत नाही, तर त्याच्या भावनांना नेमकी दिशा देतो. छंदाचे बंधन स्वीकारल्यावर भाषेतील सौंदर्य, गेयता आणि स्मरणीयता अधिक ठळकपणे प्रकट होते, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
मुक्तछंदाविषयी बोलताना सतीश सोळांकूरकर यांनी स्पष्ट केले की, मुक्तछंद म्हणजे छंदाचा अभाव नव्हे, तर अंतर्गत लयीचा स्वीकार आहे. मुक्तछंदात बाह्य नियम कमी असले तरी आशयाची आणि भाषेची जबाबदारी अधिक वाढते. मुक्तछंदात लिहिताना शब्दांची काटेकोर निवड, प्रतिमांची अचूकता आणि अंतर्मनातील लय जपणे आवश्यक असते; अन्यथा कविता गद्याच्या जवळ जाऊन पोहोचते, असा महत्त्वाचा इशारा त्यांनी दिला.
दोन्ही प्रकारच्या कवितांबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी नवोदित कवींना सल्ला दिला की, मुक्तछंद आणि छंदोबद्ध कविता यांना विरोधी मानू नये. छंद ही शिस्त आहे आणि मुक्तछंद हे स्वातंत्र्य; या दोन्हींचा समतोल साधता आला तरच कविता परिपक्व होते. कवीने दोन्ही प्रकारांची समज आणि सराव करावा, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्राचे उदघाटन प्रकाश होळकर यांनी केले. उदघाटन भाषणात त्यांनी आजच्या काळात वाचनालयांची भूमिका नव्याने अधोरेखित केली. वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नसून ते विचारांची प्रयोगशाळा आहे. कवितेसारख्या साहित्यप्रकाराला व्यासपीठ देणारा अभूतपूर्व उपक्रम सार्वजनिक वाचनालयाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज घेतला ही कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे असेही त्यांनी सांगितले.
वाचनालयाचे उपाध्यक्ष विक्रांत वैद्य यांनी अध्यक्षीय मनोगतातून वाचनालयाच्या सातत्यपूर्ण साहित्यिक उपक्रमांचा आढावा घेतला. वाचन, लेखन आणि संवाद या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रमांमुळे नवोदित कवींना व्यक्त होण्याचे बळ मिळते. समारोप समारंभात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. बी. जी. शेखर यांनी सर्वांचे कौतुक केले. वाचनालयाने आदर्शवत कार्यशाळा घेऊन आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, सहाय्यक सचिव प्रा. सोमनाथ मुठाळ, सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर, ग्रंथसचिव देवदत्त जोशी, नाट्यगृह सचिव जयेश बर्वे, सांकृतिक सहाय्यक सचिव प्रशांत जुन्नरे आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर आणि प्रमुख सचिव सुरेश गायधनी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सकाळच्या सत्राचे सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. दुपारच्या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप अहिरे यांनी केले. किरण सोनार, डॉ.अंजना भंडारी आणि राजेंद्र उगले यांनी परिचय करून दिला. सहाय्यक सचिव प्रा. सोमनाथ मुठाळ आणि गोरख पालवे यांनी आभार मानले.
– कार्यशाळेच्या शेवटी सहभागी सर्व कवींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कवितेच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण, संवेदनशीलतेची जोपासना आणि साहित्यिक संस्कृतीचा विकास साधणारा हा उपक्रम नाशिकच्या साहित्यिक जीवनात दिशादर्शक ठरला.
– आज कविता लिहिली जाणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ती समजून घेणेही आवश्यक आहे. अशा कार्यशाळा कवितेला केवळ व्यासपीठ देत नाहीत, तर तिला जबाबदारीची जाणीवही करून देतात. शब्दांमधून विचारांची मशाल पेटवण्याचे कार्य करणारी ही कविता कार्यशाळा साहित्यिक चळवळीचा एक अर्थपूर्ण टप्पा ठरली
—