नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील मेरी-रासबिहारी रोडवरील व औदुंबर लॉन्स समोरील अवधूत कॉलनी ही वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी अत्यावश्यक सुविधांपासून वंचित आहे. गेल्या ९ ते १० वर्षांपासून ही स्थिती आहे.
या भागात बंगले व सोसायट्या अनेक आहेत. पण, मतदार कमी म्हणून कॉलनीकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून आपली स्वप्नातली घरे महापालिकेची परवानगी घेऊन, सर्व प्रकारचे कर भरून व कर्ज काढून उभारले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी या काॅलनीकडे दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांना रात्री अंधारात चाचपडत रोज घरी जावे लागत आहे.
पावसाळ्यात तर प्रचंड चिखल तुडवावा लागतो. ड्रेनेज नसल्याने कुचंबना होत आहे. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अद्यापही टाकली गेली नसल्याने इतरत्र हिंडावे लागते. जलपरीचे पाणी प्यावे लागते. सुविधा नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
– दिलीप अहिरे, स्थानिक रहिवासी