नाशिक : प्रतिनिधी
अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे) आणि अशोका एकात्मिक बी.एड. महाविद्यालय (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबीर उत्साहात झाले.
अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी महादेवपूरच्या सरपंच अंबिका पोटींदे, उपसरपंच केशव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, प्राचार्य डॉ. आशा ठोके, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रिया कापडणे, तसेच रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील 25 स्वयंसेवकांनी महादेवपूर येथे निवासी शिबिरात विविध सामाजिक उपक्रम राबवलेत. यात ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, डिजिटल साक्षरता, मोफत आरोग्य शिबिर, गावातील जिल्हा परिषद शाळेचे परिसर सुशोभीकरण, त्याचबरोबर गावकऱ्यांसाठी वर्मी कंपोस्ट प्लांट याची कार्यशाळा, अनेक विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने झाली. मानसिक आरोग्यावर आधारित व्याख्यान झाले.
अशोक मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या मदतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर, तसेच ऍनेमिया आजारावरील समुपदेशनही केले. स्वयंसेवकांनी डिजिटल साक्षरता, स्त्री सशक्तिकरण, स्त्री शिक्षण अशा विविध विषयांवर पथनाट्य सादर करीत ग्रामस्थांचे उद् बोधन केले.