नाशिक : प्रतिनिधी
येथील अशोका एज्युकेशन्स फाउंडेशन संचलित अशोका सेंटर फॉर बिझनेस ॲण्ड कॉम्प्यूटर स्टडीज, चांदशी येथील शिक्षकांसाठी सहा दिवशीय प्रेरणादायी कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या आयक्यूएसी विभागातर्फे करण्यात आले होते. महाविद्यालयातील विविध विभागांची कार्यपद्धतीची ओळख करून देणे आणि शिक्षकांसाठी विविध सत्रांचे आयोजन करणे हा यामागचा हेतू होता.
सत्राची ओळख बीबीए – सीए शाखा विभागप्रमुख आणि आयक्यूएसी विभागप्रमुख प्रतिमा जगळे यांनी करून दिली. प्राचार्य डॉ. पी. ए. घोष यांनी प्रेरणादायी सत्राचा हेतू यावर भाष्य केले. नवीन शैक्षणिक दिनदर्शिका, सीओ – पीओ, मायक्रोप्लॅन आदींबाबत बीएस्सी – सीएस शाखा विभागप्रमुख सोनाली इंगळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
एम्पॉवेरिंग ग्रोथ थ्रू मेंटॉरशिप या विषयावर संस्थेचे प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे यांनी मेंटॉरशिपचे महत्व, विदयार्थी घडविण्यामध्ये मेंटॉरची भूमिका, तसेच दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांसाठी प्रतिष्ठित जर्नल्समध्ये संशोधन लेखाचे प्रकाशन या विषयावर संशोधन सल्लागार सोहेल पिरानी यांनी मार्गदर्शन केले. ब्लूम्स टॅक्सोनॉमी : अ रोडमॅप टू लर्निंग आउटकम्स या विषयावर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या शिक्षण विभागाच्या बीओएस सदस्य डॉ. लीना पिंपले यांनी मार्गदर्शन केले. पॉश कायदा या विषयावर प्रमाणित पॉश प्रशिक्षक रीना बाजपेयी यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षिका रेवती नायर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिमा जगळे, सुजाता कातकाडे यांनी केले. सत्राकरिता संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, सचिव श्रीकांत शुक्ला, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, प्राचार्य डॉ. पी. ए. घोष आणि उपप्राचार्य डॉ. हर्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
—