नाशिक : प्रतिनिधी
खरे तर निसर्गास अनुकूल जीवनशैली प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. मात्र, तसे न होता धावपळीमुळे तणाव वाढला. त्यातून रोग बळावले. या पार्श्वभूमीवर प्राचीन उपचार पद्धती म्हणजेच निसर्गोपचाराने रूग्णांना परत निसर्गाशी जोडली जाणारी जीवनशैली प्राप्त होऊ शकते, असे प्रतिपादन इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या उत्तर महाराष्ट्राच्या संयुक्त सचिव व श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्ग उपचार केंद्र व निसर्ग विद्या निकेतनच्या अध्यक्ष डाॅ. तस्मीना शेख यांनी केले.
इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन व सूर्या फाउंडेशन यांच्यातर्फे राष्ट्रीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. त्यातंर्गत सडक पर चले या विषयावर डाॅ. शेख बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे. मग, त्याला रोगमुक्तही पंचमहाभूतेच बरे करू शकतात. त्यासाठी निसर्गाशी नाते सांगणाऱ्या ॲक्युप्रेशर,ॲक्युपंक्चर, सुजोग, चुंबकीय, कपिंग, जल चिकित्सा प्रभावशील आहेत.
ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर या चिकित्सापद्धती मूळच्या भारताच्याच आहेत. त्या चीनमध्ये गेल्या व तेथून वेश बदलून परत आपल्याकडे आल्या आहेत,असे सांगून त्या म्हणाल्या की, मर्म चिकित्सा, दिव्य स्पर्श, मायेने डोक्यावर ठेवलेला हात म्हणजे ॲक्युप्रेशर चिकित्सा होय. ॲक्युप्रेशर व निसर्गोपचार एकमेकांशी जोडलेले आहेत. यामध्ये शरीरातील स्थिर बिंदूंवर दबाव टाकून रोगनिवारण केले जाते. पितामह भीष्म बाणांच्या अग्र शय्येवर राहूनही अनेक दिवस जिवंत होते, हे त्याचे एक उदाहरण आहे. तसेच एका युद्धात एका कॅप्टनच्या खराब लिव्हरवर बाण लागला. पण, त्यातून त्याच्या लिव्हरची शक्ती वाढली. कारण तो बाण त्याच्या लिव्हरच्या अचूक बिंदूवर लागलेला होता. त्यामुळे लिव्हरची शक्ती वाढली. ही विनाखर्चिक चिकित्सा आहे. दगड, लाकूड, पेन पेन्सिलने अवयवाचे केंद्र दाबल्यानंतर या चिकित्सेत आराम पडतो. या पद्धतीत स्पर्श, दाब व घर्षण यांचा समावेश आहे. विविध मुद्रा, योगासने आपण करून घेतो हे सर्व शरीराला लाभदायक होते. आपण आभूषणे घालतो त्यातून अवयवांवर प्रेशरपाॅईंट तयार होतो. डाॅ. शेख म्हणाल्या की, प्राणशक्ती शरीरभर फिरत असते. ती या चिकित्सेने प्रभावी होते. पृथ्वी चिकित्सेत मातीउपचार येते. जलोपचारात कटीस्नान, बस्ती आदी उपाय आहेत. आपल्या शरीरात 70 टक्के पाणीच आहे. त्यामुळेच त्यावर जल उपचार योग्य ठरतात. चुंबकीय चिकित्सेतही प्रेशर पाॅईंटवर चुंबकाने दबाव टाकला जातो. सुजोग थेरपीत मेथी, वाटाणा यांचे दाणे हे हात व पाय यांच्या प्रेशर पाॅईंटवर बांधले जातात. या पाॅईंटला 12 अवयवे जोडलेली असतात. त्यांना या थेरपीतून आराम पडतो.
एकंदरीतच निसर्गोपचारात रोगाचे मूळ असलेले विषाक्त पदार्थ शरीराबाहेर काढले जातात. त्यामुळे शरीर पुन्हा पूर्ववत निरोगी होते, असेही डाॅ. शेख यांनी सांगितले.
इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे राज्याचे कार्यकारी अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी शिवानंद यांनी प्रास्ताविक केले. योगाचार्य अशोक पाटील यांनी परिचय करून दिला.
याप्रसंगी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. अनंत बिरादर, डाॅ. सुशांत पिसे, जिल्हा संयुक्त सचिव व श्रीमती पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्ग उपचार केंद्र व निसर्ग विद्या निकेतनच्या सुनिता पाटील, रणजित पाटील, डाॅ. योगेश सदगीर, मानसशास्त्राचे अभ्यासक प्रा. तुषार विसपुते, रमाकांत जाधव (उत्तर महाराष्ट्र, कार्यकारी अध्यक्ष), शुभांगी रत्नपारखी (उत्तर महाराष्ट्र, उपाध्यक्ष), राहुल येवला (नाशिक जिल्हा, उपाध्यक्ष), पी. डी. कुलकर्णी (शिक्षणतज्ज्ञ), इसाक शेख, प्रा. यू. के. अहिरे, प्रा. अशोक पाटील, उल्हास कुलकर्णी, दीपाली लामधाडे, वैशाली पाटील, डाॅ. भगवान म्हस्के, डाॅ. मयुर खरे, राधिका खंडाळकर, ॲड. पुष्पेंद्र दीक्षित आदी उपस्थित होते.
—