नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या गंगापूर रोड येथील मराठा हायस्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची दमदार आणि जोशपूर्ण सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक उत्तमराव बस्ते, पर्यवेक्षक शरद शेजवळ, संजीवनी घुमरे, मंदाकिनी पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी व मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी हा पंधरवडा इयत्ता पाचवी ते सातवी (सकाळ सत्र) व इयत्ता आठवी ते दहावी (दुपार सत्र ) या दोन्ही सत्रात घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोवीड च्या सर्व शासकीय नियमांचे पालन करून या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवीमध्ये श्रीतेज पेखळे, जयेश शेवाळे, विश्वजीत जाधव या विद्यार्थ्यांनी `लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीʼ ही कविता सादर केली. अर्चना गाजरे यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. इयत्ता आठवी ते दहावीच्या दुपारसत्रात देखील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कस्तुरी शिंदे व श्रावणी पगार या विद्यार्थिनींनी `लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीʼ या गीताचे सादरीकरण केले. तसेच हेतल निकुंभ व भक्ती लोखंडे या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर केली.
सविता जाधव व दीपमाला झाडे यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापक बस्ते यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख चैताली गीते व मराठी विषय समितीच्या प्रमुख सुरेखा भंडारे व सुनीता गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य, संगीत शिक्षक दिनकर दांडेकर व विद्यालयाचा गीतमंच यांनी परिश्रम घेतले.
—