पंचवटी : प्रतिनिधी
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती, नाशिक आणि वसंत व्याख्यानमाला, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कथा तथागताची ही तीन दिवसीय व्याख्यानमाला एक मे २०२६ पासून होत आहे. संत गोविंददेव गिरीजी महाराज यात मार्गदर्शन करणार आहेत. यशवंतराव महाराज पटांगण, गोदाघाट, नाशिक येथे होणाऱ्या या व्याख्यानमालेस सर्वांनी आवर्जून यावे, असे आवाहन दिनेश पगारे (माजी प्रदेश सरचिटणीस व महामंत्री अनुसूचित जाती मोर्चा, भाजप) यांनी केले आहे.
आजच्या बदलत्या काळात समाजाला विचार, मूल्य, समता आणि करुणेचा संदेश देणारे चिंतन अत्यंत आवश्यक झाले आहे. तथागत बुद्धांच्या जीवनातील मानवतेचा संदेश उलगडणारा चिंतनसोहळा समाजमनाला नवी दिशा देणारा असावा, या भावनेतून सर्व धर्मप्रेमी नागरिक, अभ्यासक, विचारवंत व रसिक श्रोत्यांसाठी ही त्रिदिवसीय व्याख्यानमाला होत आहे.
पगारे यांनी निवेदनात म्हटले की, ही अपूर्व ज्ञानगंगा महाराष्ट्रातील नाशिक येथे होत आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक नाशिक शहरात, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीमध्ये, महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मभूमीमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचे ज्ञान अमृत ग्रहण करण्यासाठी, तमाम महाराष्ट्रातील बोधिसत्व भगवान गौतम बुद्ध यांचे ज्ञानामृत ग्रहण करण्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, आबालवृद्ध, तरुण वर्ग यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म समजून घेण्यासाठी, ज्ञानग्रहण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. आपण या व आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन या. ही व्याख्यानमाला१, २ आणि ३ मे २०२६ ला सायंकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान होणार आहे. सहयोगी संस्था सामाजिक समरसता मंच, अनुलोम, आधार महिला मंडळ, जय भीम आर्मी, मुंबई, संविधान जागर समिती, महाराष्ट्र संत सेवा संघ, महाराष्ट्र आहेत.
—
नाशिकमध्ये एक मे २०२६ पासून कथा तथागताची ही तीन दिवसीय व्याख्यानमाला
Get real time updates directly on you device, subscribe now.