पंचवटीतील प्रभाग क्र. ३ मध्ये नागरिक कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त

0

नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील प्रभाग क्र. ३ मध्ये नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. यासाठी स्थानिक नगरसेवकांनी नुकतेच आंदोलनही केले होते. त्यामुळे प्रश्न सुटला, असे वाटले पण, ही स्थिती तात्पुरती ठरली, असल्याचे लक्षात आले आहे.  या प्रभागाच्या हक्काच्या ‘निलगिरी वाघ जलशुद्धीकरण केंद्रातून’ पाणी असतानाही, ते पाणी जाणीवपूर्वक द्वारका परिसराकडे वळवले जात असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका प्रियंका माने व भाजपचे नाशिक महानगर उपाध्यक्ष धनंजय माने यांनी केला आहे. त्यांनी याचा निषेध केला आहे. द्वारका परिसरात पुन्हा दोन वेळा पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. हा प्रभाग क्रमांक तीनच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवक व महापौर एकाच पक्षाचे असतानाही हा अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले. या अन्यायाविरुद्ध काही दिवसांपूर्वीच नगरसेविका प्रियंका धनंजय माने व सहकारी नगरसेवक यांनी पहाटे चार वाजता जलशुद्धीकरण केंद्रावर आंदोलन केले होते. तसेच महासभेत ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाचे डोळे उघडले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने द्वारका परिसराचा पाणीपुरवठा एक वेळ करून प्रभाग क्रमांक तीनला न्याय देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अत्यंत खेदाची बाब म्हणजे महापौर हिमगौरी आहेर – आडके यांनी प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपच्या चारही नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. उबाठा गटाच्या नगरसेवकांची पाठराखण केली व द्वारका परिसरात पुन्हा दोन वेळा पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आमच्या प्रभाग क्रमांक तीनच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकला आहे, असे माने यांचे म्हणणे आहे.

स्वतःच्याच पक्षाच्या नगरसेवकांवर आणि प्रभागातील जनतेवर महापौरांनी केलेला हा अन्याय आम्ही कदापी सहन करणार नाही. महापौरांच्या या पक्षपाती निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे.
– प्रियंकाताई धनंजय माने, नगरसेविका प्रभाग क्र. ३.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.