नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील गिरणारे महसूल मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले होते. हे शिबिर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाचा भाग असून, सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या महसूल-संबंधित समस्या तात्काळ सोडवण्यासाठी राबवले जाते.
शिबिर १४ मार्च २०२६ रोजी गिरणारे मंडळात यशस्वीरित्या पार पडले. या ठिकाणी महसूल, पुरवठा, सेतू, संजय गांधी निराधार योजना आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रलंबित फेरफार, सातबारा अद्ययावत, पंतप्रधान किसान योजना, तुकडेबंदी, ई-मोजणी, सामाजिक अर्थसहाय्य आणि दाखले वाटप यासारख्या सेवा देण्यात आल्या.
नागरिकांचा प्रतिसाद
नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि त्यांच्या प्रलंबित कामांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. शिबिरामुळे गावपातळीवर शासकीय सेवा गतिमान आणि पारदर्शक झाल्या, असा प्रत्यक्ष लाभ झाला. हे अभियान मार्च ते मे २०२६ दरम्यान मंडळ, तालुका आणि नगरपालिका स्तरावर राबवले जात असून, गिरणारे मंडळाने यात अग्रेसर भूमिका बजावली.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील होत्या . प्रास्ताविक पंकज पवार तहसीलदार नाशिक ग्रामीण यांनी केले. निवासी नायब तहसीलदार सुनीता पाटील उपस्थित होते. पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच उपस्थित राहिले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहा मैड- नागरे मंडळ अधिकारी गिरणारे यांनी व्यासपीठावरील सर्व अधिकारी कर्मचारी व उपस्थित ग्रामस्थ यांचे आभार मानले. सदर शिबिरात गिरणारे मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी सहकार्य व काम केले.
—