नाशिक : प्रतिनिधी
येथील बालकलाकार मयुरेश राजेंद्र आढाव याच्या कलाप्रवासात आणखी एका महत्त्वाच्या यशाची नोंद झाली आहे. झारखंड येथील ‘रिवायव्हल ऑफ ट्रायबल अँड फोक आर्ट्स फाऊंडेशन’द्वारे प्रकाशित होणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय कला नियतकालिक “कला संगम (मिथिला संस्करण – २०२५)” मध्ये मयुरेशच्या कलाकृतीला स्थान मिळाले आहे. झारखंड येथील प्रख्यात कलाशिक्षक, कलाकार आणि क्यूरेटर डॉ. छाया कुमारी यांच्या संपादनाखालील प्रकाशित ‘कला संगम’ मासिकाच्या या अंकात देशभरातील विविध कलाशैली आणि सर्जनशील अभिव्यक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निवडक कलाकृतींचा समावेश आहे.
या प्रतिष्ठित अंकासाठी कलाकृती निवडताना, संपादक डॉ. छाया कुमारी यांनी मयुरेशच्या अपवादात्मक कलात्मक संवेदनशीलता, मौलिकता आणि भावनात्मक खोली बद्दल कौतुक व्यक्त केले. लहान वयातच त्याच्या कामात आढळणारे निरागसता आणि परिपक्वता यांचे दुर्मिळ मिश्रण त्यांना भावले. डॉ. छाया कुमारी यांच्या मते, मयुरेशचे रंगांचे ज्ञान, रचना आणि दृश्यात्मक कथा सांगण्याची त्याची हातोटी उत्कृष्ट आहे. मयुरेशच्या सातत्यपूर्ण कलासिद्धी आणि राष्ट्रीय स्तरावरील दखल घेत, डॉ. कुमारी यांनी त्याच्या कलाकृतीला मासिकात स्थान दिले आणि त्याला “चाईल्ड माएस्ट्रो” (Child Maestro) या श्रेणीत सन्मानित केले.
नाशिकच्या फ्रॉवशी टाऊन ॲकॅडमीमध्ये नववीत शिकणाऱ्या मयुरेशने आपल्या चित्रांमधून विचार, भावना आणि सांस्कृतिक विषय प्रभावीपणे रेखाटण्याच्या क्षमतेमुळे सर्वत्र प्रशंसा मिळवली आहे. निसर्ग, मानवी भावना आणि सांस्कृतिक मांडणी ही मौलिक असते. कलेतील त्याची निष्ठा, सातत्यपूर्ण सराव आणि विविध माध्यमांमधील प्रभुत्व त्याला देशव्यापी कलाकारांमध्ये वेगळी ओळख मिळवून देण्यास उपयुक्त ठरले आहेत, असे यावेळी डॉ. छाया कुमारी म्हणाल्या. यावर्षीच त्याला भारत सरकारच्या एम एस एम ई उपक्रम असलेल्या ‘रेनबो आर्ट वर्ल्ड’ आणि ‘कॅनव्हास आर्ट ॲकॅडमी, दिल्ली’ यांच्या वतीने इंडिया क्रिएटिव्ह टॅलेंट्स अवॉर्ड २०२५ ह्या प्रतिष्ठित पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी, फ्रॉवशी ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष रतन लथ, उपाध्यक्षा व प्रसिद्ध कलाकार शर्वरी लथ, व्यवस्थापकीय विश्वस्त मेघना बक्षी, संचालक प्राजक्ता जडे आणि फ्रॉवशी टाऊन ॲकॅडमीच्या प्राचार्या व शैक्षणिक संचालक डॉ. मनीषा पवार यांनी मयुरेशचे अभिनंदन केले आहे. मयुरेश विविध कला स्पर्धा, प्रदर्शने आणि सर्जनशील कार्यशाळांमध्ये सक्रियपणे सहभागी होत असून, आपल्या कौशल्यांमध्ये सतत सुधारणा करत आहे आणि आपली कलादृष्टी व्यापक करत आहे. “कला संगम (मिथिला संस्करण – २०२५)” मध्ये त्याच्या कलाकृतीचे प्रकाशन हे एक महत्त्वपूर्ण यश असून, उदयोन्मुख बालकलाकार म्हणून त्याची ओळख झाली आहे.
—