नाशिक : प्रतिनिधी
अश्विनगर, सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आंटी व भैय्या यांचा क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. या सोहळ्यासाठी त्यांचे कुटुंबीयही आमंत्रित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मैदानावर घेण्यात आलेल्या शर्यतीने झाली. त्यानंतर भैय्यांसाठी लिंबू-चमचा या मनोरंजक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सहभागी आंटी व भैय्या यांनी उत्स्फूर्तपणे खेळांमध्ये सहभाग घेतला. कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती विशेष ठरली.
आंटींसाठी चेंडू गोळा करणे हा उत्साहवर्धक खेळ घेण्यात आला. तसेच रस्सीखेच व यानंतर आंटी आणि भैय्या यांची एकत्रित साखळी शर्यत (रिले रेस) घेण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात विशेष रंगत निर्माण झाली. आंटी व भैय्या यांच्या कुटुंबीयांना देखील कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली.
यावेळी आंटी व भैय्या यांनी संस्थेच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शालेय संस्थेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सांभाळून घेतले जाते, त्यांना आधार दिला जातो. तसेच त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर विचार केला जातो, याबद्दल त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शालेय संस्थापिका, विश्वस्त व मुख्याध्यापिका यांचे आभार मानले.
या क्रीडा महोत्सवामुळे परस्पर स्नेह, एकोपा व क्रीडाभावना अधिक दृढ झाली. आनंद, उत्साह व आपुलकीने भरलेला हा दिवस सर्व सहभागींसाठी संस्मरणीय ठरला.
—