नाशिक : प्रतिनिधी
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमिक विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा सायंकाळी शाळेच्या प्रांगणात उत्साहात झाला. द ग्रिंच या जागतिक प्रसिद्ध कथानकावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ५ वी ते ९ वीतील विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, संगीत, निवेदन अशा विविध कलांच्या सादरीकरणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून लीना बनसोड (आयुक्त – आदिवासी विकास,नाशिक) यांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी बक्षीस, आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच अन्य विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या संस्थापिका, विश्वस्त मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला.
सुरुवातीला वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दीर्घकाळ केलेल्या परिश्रमाचे आणि काटेकोर सरावाचे प्रतिबिंब त्यांच्या अचूक सादरीकरणातून दिसून आले. कार्यक्रमाला पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत विद्यार्थ्यांना भरभरून दाद दिली.
आपल्या भाषणात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी व पालकांना मूल्यशिक्षण, सकारात्मकता आणि आनंदाने शिकण्याबाबत प्रेरणादायी संदेश दिला. जल्लोष, धमाल, मस्ती आणि आनंदमयी वातावरणात साजऱ्या झालेल्या या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांमध्ये आनंद मिळवणे आणि चांगली मूल्य रुजवणे हा शाळेचा उद्देश प्रभावीपणे साध्य झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
—
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष
Get real time updates directly on you device, subscribe now.