नाशिक : प्रतिनिधी
अश्विननगर येथील युडब्ल्यूसीईसीच्यावतीने आयोजित वार्षिक सभेचा आकर्षक समारंभ `लिट्ल स्टार्स विथ ग्रेट व्हॅल्यूज –लहान पावलांतून मोठा बदलʼ या कल्पनेवर आधारित होता. आत्मविश्वास वाढवणे, संघभावना विकसित करणे आणि व्यासपीठावर न घाबरता आत्मविश्वासाने बोलणे या गुणांसह मुलांच्या सर्वांगीण विकासात अशा कार्यक्रमांचे महत्त्व याप्रसंगी अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध कलाकार व डिझायनर सोनू बाफना उपस्थित होत्या. लहानग्या विद्यार्थ्यांनी मूल्याधारित गोष्टी प्रभावी अभिनयातून आणि नृत्याच्या मनमोहक सादरीकरणातून साकारून उपस्थितांची मने जिंकली. या गोष्टी आणि त्यांचे नाट्यरूपांतर यांच्यामार्फत मूल्यांचे शिक्षण अधिक परिणामकारक होते, याची प्रचिती यावेळी उपस्थितांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून आली.
संस्थापिका प्राचार्या सुमन दत्ता यांनी पालकांशी संवाद साधत मुलांसाठी प्रेमळ, पोषक आणि सुरक्षित घरगुती वातावरण निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुख्य अतिथींनी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या कष्टांचे मनःपूर्वक कौतुक करत कार्यक्रमाला अविस्मरणीय बनवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
—