नाशिक : प्रतिनिधी
सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमिक विभागात वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात झाले. सायंकाळी ५.३० वाजता शाळेच्या प्रांगणात सुरू झालेल्या या कार्यक्रमाला पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. शाळेच्या संस्थापिका, विश्वस्त, मुखाध्यापिका, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांच्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते द ग्रिंच या कथानकावर सादर केलेली रंगतदार नाटिका, नृत्य, रंगमंचीय प्रयोग आणि विद्यार्थ्यांच्या बहुगुणी कौशल्यांचे प्रदर्शन. ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या अचूक सादरीकरणातून दीर्घकाळ केलेला सराव आणि उत्तम संघभावना स्पष्टपणे जाणवली.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते व निर्माते रवी दुबे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे, उर्जेचे आणि सादरीकरणातील परिपूर्णतेचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाचा शुभारंभ स्वागतगीताने झाला. त्यानंतर शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या गौरवक्षणांनी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाची नवचैतन्याची लहर निर्माण केली.
कार्यक्रमभर शाळेचे प्रांगण जल्लोष, आनंद, हशा आणि टाळ्यांच्या गजराने भरून गेले होते. आनंद देणे व चांगली मूल्यं रुजवणे हा शाळेचा उद्देश या स्नेहसंमेलनातून प्रभावीपणे साध्य झाल्याचे जाणवले. हा वार्षिक सोहळा विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे व पालकांच्या पाठबळाचे आणि शिक्षकांच्या समर्पणाचे सुंदर प्रतिबिंब ठरला.
—