भगवद्गीता हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील रणांगणावर घडलेला संवाद आहे. परंतु, तिचा खरा संदेश केवळ युद्धाविषयी नसून, दररोज विवेकपूर्वक कसे जगावे याबद्दलही आहे. त्यातील एक अत्यंत सामर्थ्यशाली शिकवण म्हणजे निष्काम कर्म: फळांची आसक्ती न ठेवता आपले सर्वोत्तम कार्य करणे.
महान भारतीय आध्यात्मिक गुरू श्री श्री परमहंस योगानंद यांच्या मते, निष्काम कर्मे करणे हा योगाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यांच्या ‘गॉड टॉक्स विथ अर्जुना: द भगवद् गीता’ या स्मारकीय भाष्यात, त्यांनी स्पष्ट केले की कृष्णाचा संदेश हे केवळ एक अमूर्त तत्त्वज्ञान नाही, तर गृहस्थ जीवन जगणारा असो, कंपनीचा प्रमुख असो, किंवा ईश्वराचा शोध घेणारा असो, अशा कोणासाठीही तो एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे.
भगवद्गीतेच्या अध्याय 2, श्लोक 47 मध्ये, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात:
“तुझा मानवी अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे, कर्माच्या फळांवर कधीही नाही. स्वतःला तुझ्या कर्मांच्या फळांचा कर्ता मानू नकोस; तसेच निष्क्रियतेवर आसक्ती ठेवू नकोस.”
याचा अर्थ असा आहे की, आपले कर्तव्य करा — मग ती तुमची नोकरी असो, कुटुंबाची काळजी घेणे असो किंवा कोणतीही जबाबदारी असो, पण प्रतिफळ किंवा मान्यतेच्या निरंतर चिंतेत जगू नका. “मला काय मिळेल” याची चिंता करणे केवळ तणाव निर्माण करते. जेव्हा तुम्ही केवळ कर्मावर लक्ष केंद्रित करता, त्याच्या परिणामांवर नाही, तेव्हा मुक्ती प्राप्त होते. त्याच वेळी, आळशी किंवा निष्क्रिय होऊ नका.
पुढे 48 व्या श्लोकात, कृष्ण अर्जुनाला उपदेश करतात:
“हे धनंजय (अर्जुन), योगमग्न होऊन सर्व कर्मे करा, त्यांच्या फळांच्या आसक्तीचा त्याग करून, यश-अपयश यांमध्ये समभाव राखा. हे समत्व म्हणजेच योग होय.”

आयुष्यात स्तुती आणि निंदा, तसेच यश आणि अपयश येत असतात. दोन्ही परिस्थितीत शांत राहण्याची शिकवण कृष्ण आपल्याला देतात. हे समत्व म्हणजे खरा योग – आंतरिक शांती आणि बाह्य कृती यांचा मिलाफ होय.
नंतर, अध्याय 3, श्लोक 30 मध्ये, कृष्ण ही अवस्था प्राप्त करण्याची गुरूकिल्ली सांगतात:
“सर्व कर्मे मला अर्पण कर! अहंकार आणि अपेक्षाविरहित होऊन, तुझे चित्त आत्म्यावर एकाग्र करून, उद्विग्न चिंतेपासून मुक्त होऊन, (कर्मरूपी) युद्धात सहभागी हो.”
सोप्या शब्दांत : तुम्ही जे काही करता ते सर्व परमेश्वराला अर्पण करा. अशा प्रकारे जगणे म्हणजे जगापासून निवृत्त होणे नाही, तर प्रत्येक कृती त्याला अर्पण म्हणून करणे होय — अशांत इच्छेशिवाय, अहंकाराशिवाय, अपेक्षेशिवाय आणि उद्विग्न चिंतेविना. शांततापूर्ण जीवनाचा हाच एकमेव मार्ग आहे.
आणि अध्याय 5, श्लोक 10 मध्ये, कृष्ण एक सुंदर दृष्टान्त सादर करतात:
“ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्याने कधीही लिप्त होत नाही, त्याप्रमाणे जो योगी आसक्तीचा त्याग करून आणि आपली कर्मे अनंताला समर्पित करून कर्म करतो, तो इंद्रियांच्या गुंत्यातून मुक्त राहतो.”
चिखलात वाढणाऱ्या तरीही त्यापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणेच, मनुष्य प्रापंचिक संघर्षांमध्ये राहूनही निष्काम कर्म आणि ईश्वराला शरण जाऊन शांत राहू शकतो.
योगानंदजींनी पाश्चात्त्य देशांमध्ये सेल्फ-रिअलाइ झेशन फेलोशिप (SRF) आणि योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (YSS) ची स्थापना या कालातीत शिकवणी सामायिक करण्यासाठी केली. त्यांचा अभिजात ग्रंथ, ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ (Autobiography of a Yogi), याने लाखो लोकांना योग आणि ध्यानाशी परिचय करून दिला, आणि विशेषतः भगवद्गीतेमध्ये उल्लेखलेल्या प्राचीन क्रियायोगाशी, जो ईश्वराचा थेट अनुभव घेण्याचा एक मार्ग आहे.
निष्काम कर्म म्हणजे जबाबदाऱ्यांपासून दूर पळणे नव्हे, परंतु फळांना चिकटून न राहता कार्यालयात, नातेसंबंधासाठी आणि वैयक्तिक ध्येयांसाठी मनःपूर्वक काम करणे.
युद्धभूमी प्रतीकात्मक असू शकते, परंतु खरा संघर्ष आसक्ती आणि स्वातंत्र्य, अहंकार आणि शरणागती यांच्यात आहे. भगवद्गीता आपल्याला दर्शवते की, विजय निष्काम कर्म (इच्छारहित कृती) करण्यात आहे, कारण केवळ तेच शाश्वत आनंद प्रदान करते.
लेखिका: रेणु सिंह परमार